मुंबई : झोपडपट्टी परिसरात रेकी करून घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अक्षय राजू डुगलज (वय 25) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे 89 मोबाईल जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचे बोलले जाते. सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
28 ऑगस्टला जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरात राहुल रामगोपाल मिश्रा यांचा 50 हजाराचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी करून पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत मोबाईल चोरीची तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रभात मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील, उपनिरीक्षक दिपक थोरात, पोलीस अंमलदार आनंदा पवार, सिद्धार्थ भंडारे, धनंजय जगदाळे, विनोद राठोड, विठ्ठल सकट, सोनूसिंह पाटील, अजीत भंगड यांनी आरोपीचा शोध सुरू केला.शोधमोहीम सुरू असताना परिसरातील सीसीटिव्ही व तांत्रिक माहितीवरुन या पथकाने जोगेश्वरी येथून अक्षय डुगलज याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याचा मित्र मंगेश खिल्लारे याच्या मदतीने चोरीची कबुली दिली.
या कबुलीनंतर त्याच्या घरासह वैभव सर्कलपासून सेलिब्रेशन क्लबकडे जाणार्या ब्रिजखाली लपवून ठेवलेले चोरीचे 89 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. या मोबाईलची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये इतकी आहे.