Skill India International Centre Mumbai pudhari photo
मुंबई

Skill India International Centre Mumbai : मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’

परदेशातील रोजगाराच्या मार्गदर्शनासाठी सहा विभागांत प्रशिक्षण संस्था विकसित करणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : परदेशात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या महसुली विभागांत जागतिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विकसित करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. आधुनिक क्षेत्रांतील प्रशिक्षणासह परदेशी भाषांचे ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी मार्गदर्शन या केंद्रांच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कौशल्य विभाग आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे, उद्योगांच्या गरजांनुसार मनुष्यबळ तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी वाढविणे, हा या सहकार्यामागील उद्देश आहे.

याशिवाय उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारी कार्यक्रम बळकट करण्याचे नियोजन आहे. महिला उद्योजकांना बाजारपेठेशी जोडणे, डिजिटल व्यापाराचे प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक तसेच जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

या वेळी कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार पिल्लई यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एआय, ड्रोन तंत्रज्ञानाचे देणार प्रशिक्षण

या केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजांनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्वयंचलित यंत्रणा, ड्रोन तंत्रज्ञान आणि माहिती विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यावर भर असेल. परदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जर्मन, जपानी आणि इंग्रजी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच परदेशी नियोक्त्यांशी समन्वय साधून उमेदवारांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT