Political News Pudhari
मुंबई

Political News: राज्‍यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार; ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंच्या गळाला

शिवसेना वर्धापन दिनापूर्वीच ठाकरेंना धक्का

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. शिवसेना उबाठात फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेला ६ खासदारांचा आकडा सोमवारी अखेर पूर्ण झाला असून शिवसेनेच्या वर्धापनदिनी (ता. १९ जून) हे ६ खासदार उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे यांचा झेंडा हाती घेणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे हे ६ खासदार मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्याचेही समजते. भाजपने या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडीकडे पूर्णतः लक्ष ठेवले आहे.

मुंबईतील तीन आणि उत्तर महाराष्ट्रातील एक वगळता लोकसभेतील उबाठाचे सर्व खासदार आता शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. ही लढाई न्यायालयात जावी यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले.

एकनाथ शिंदेही दिल्लीत

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच शिंदेंच्या एका नेत्याने भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात असून खासदारांचा गट सोबत घ्यायचे झाल्यास त्या संदर्भातली कार्यवाही पूर्ण करण्याची शक्यता आहे, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

ओमराजें निंबाळकरांनी बाजू बदलल्याने गणित जुळले

दोन तृतीयांश फूट प्रत्यक्षात यावी यासाठी शिवसेना उबाठाचे नऊ खासदार निवडून आल्याने सहा खासदारांची गरज होती. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे खंदे पाठीराखे असलेल्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजू बदलल्याने आकड्यांचे गणित पूर्ण झाले. निंबाळकर यांच्‍यासह संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय दीना पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे यांचा बंडखोरांमध्ये समावेश.

स्‍थापना दिनाचा मुहूर्त?

१९ जुलै रोजी शिवसेनेचा स्थापना मेळावा गोरेगाव येथे होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आम्ही आदरपूर्वक स्वीकार करत असल्याची घोषणा यावेळी केली जाईल, असे समजते.

खासदार फोडण्यासाठी १५ कोटी ॲडव्हान्स, राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी चर्चा असताना संजय राऊत यांनी एक लक्षवेधी ट्विट केले. या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठ आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे. त्यामुळे खासदार फुटणार असल्याच्या चर्चांवर एकप्रकारे शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठाकरेंचे विश्वासू नेते दिल्लीत, आज माध्यमांशी बोलणार

सध्याच्या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रयत्न सुरू आहते. यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सर्व खासदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क करत असून त्यांच्याशी संवाद साधत असल्याचेही समजते.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी त्यांच्या पातळीवरूनही पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे समजते. सोबतच अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे हे देखील बुधवारी दिल्लीत झाले आहेत. यापैकी संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाची भूमिका मांडणार असल्याचेही समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT