मुंबई : राज्यातील शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती आणि बोगस शालार्थ आयडीच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. या चौकशी समितीमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांखेरीज न्यायालयाच्या व्यवस्थापनातील अधिकार्यांची नियुक्ती करून राज्यस्तरीय एसआयटी गठित केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली.
मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत एसआयटीमधील अधिकार्यांची नावे घोषित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण आयुक्तांनी यापूर्वी नियुक्ती मान्यता प्रकरणात दोषी घोषित केलेल्या 59 शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईची फाईल मंत्रालयातील अधिकार्यांनी दाबून ठेवली असल्याचा आरोप भाजपचे संदीप जोशी यांनी केला. त्याची दखल घेऊन भोयर यांनी संबंधित फाईल तातडीने मागवून घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.