मुंबई: ‘मुंबईची जमीन मुंबईकरांचीच,’ अशी ग्वाही देत पुढील पाच वर्षांत मुंबईकरांसाठी 1 लाख परवडणारी घरे बांधणार, अशी हमी शिवसेना (ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांनी दिली आहे. मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार, कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारी मासाहेब किचन्स सुरू करणार, मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरवर महिलांसाठी शौचालये बांधणार, अशी आश्वासने तिन्ही पक्षांनी आपल्या संयुक्त वचननाम्यात दिली आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुंबईत युती म्हणून लढणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वचननामा रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे दोन दिवसांपूर्वी विविध मुद्द्यांचे प्रेझेंटेशन दिले होते. याच प्रेझेंटेशनचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते वचननामा म्हणून अधिकृतपणे प्रकाशन करण्यात आले.
बेस्ट बस दरवाढ कमी करणार
बेस्ट बस तिकीट दरवाढ कमी करून रुपये 5,10,15,20 फ्लॅट रेट ठेवण्यात येणार. तसेच बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल-डेकर इलेक्ट्रिक बसेस असतील.
आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
मुंबईत 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये व दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधी. ज्येष्ठ नागरिकांसाठी 247 हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ टू होम सेवा.
मनपा ज्युनिअर कॉलेज
शैक्षणिक गळती रोखण्यासाठी महापालिका शाळांमध्येच आता बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज. मराठी भाषा संवर्धनासाठी सर्व माध्यमांच्या शाळांत ‘बोलतो मराठी’ हा विशेष उपक्रम.
महिलांना 1500 रुपये
घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी. कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी, अर्थसाहाय्य आणि नवीन परवान्यांची तरतूद.
प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग
बृहन्मुंबई महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग मोफत राहणार आहे. तसेच नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग देण्याचे आश्वासन.
अर्थसाहाय्य योजना
एक लाख तरुण-तरुणींना प्रत्येकी 25 हजार ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी. 25 हजार गिग वर्कर्सना व डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार.
फुटपाथ व मोकळ्या जागा
पेडेस्ट्रियन फर्स्ट धोरणाची अंमलबजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री व दिव्यांग-स्नेही करणार. मुंबईतील जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाहीत.
100 युनिटपर्यंत वीज मोफत
घरगुती वीज वापर करणाऱ्या बेस्ट विद्युतच्या ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.
देशातील सर्वांत मोठे ग्रंथालय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारले जाईल. पाळीव पशूंसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट ॲम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम.