शिवशाही होणार बंद, आता पुन्हा एशियाड!  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Shivshahi Bus | शिवशाही होणार बंद, आता पुन्हा एशियाड!

पहिल्या टप्प्यात १०० शिवशाहींचे एशियाडमध्ये रुपांतर होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सुरेखा चोपडे

वाढत्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या शिवशाहीमुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढल्याने प्रवासी सेवेत फेल ठरलेल्या या शिवशाही बसला अखेरची घरघर लागली आहे. या गाड्यांची सेवा आता बंदच केली जाणार असून, पुनर्बाधणी करण्यात आल्यानंतर या शिवशाही बस लालपरी अथवा हिरकणी (एशियाड) म्हणून धावणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महामंडळाने शिवशाहीसाठी लोकप्रिय एशियाडला इतिहासजमा केले होते. आता पहिल्या टप्प्यात १०० शिवशाही बस हिरकणी म्हणजेच एशियाड बसमध्ये रुपांतरित होणार आहेत.

साध्या गाडीत रुपांतर करण्यासाठी शिवशाहीमधील वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात येणार असून, अंतर्गत बदलांसह रंगसंगती देखील बदलण्यात येणार आहे. शिवशाहीचे रुपांतर लालपरी अथवा हिरकणी बसमध्ये केल्यानंतर तिकीट दरात देखील बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवशाही इतिहासजमा होऊन पुन्हा एशियाड अवतरणार याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अनभिज्ञ असल्याचे दिसते. ते म्हणाले, शिवशाहीचे एशियाडमध्ये रुपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही. परंतु शिवशाहीचे अपघात, प्रवाशांच्या तक्रारी असतील आणि शिवशाहीचे एशियाडमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय प्रवासीभिमुख असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल. महामंडळाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला स्वमालकीच्या ७९० शिवशाही (वातानुकूलित ) आहेत. त्यापैकी निम्म्या बस प्रवासी सेवेत असून उर्वरित बस नादुरुस्त अवस्थेत एसटीच्या विविध कार्यशाळांमध्ये उभ्या आहेत. शिवशाही बस सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहेत. या गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळून आले आहेत. साध्या बसच्या तुलनेत शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण देखील जास्त आहे. या बस जुन्या झाल्या असून त्या रस्त्यातच बंद पडतात. खडखड आवाज ऐकू येतो. वातानुकूलित यंत्रणा बंद असते. शिवाय शिवशाहीचा वेगही तसा मंदच आहे. अशा तक्रारी वारंवार प्रवाशांनी महामंडळाकडे केल्या आहेत. परिणामी, सुरुवातीपासूनच प्रवाशांच्या पसंतीला न उतरलेली शिवशाही बस लवकरच एसटीच्या ताफ्यातून इतिहासजमा होईल.

वर्ष २०१७ मध्ये दिवाकर रावते परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष असताना अगदी वाजतगाजत मुंबई-रत्नागिरी या मार्गावर शिवशाही बसचा जन्म झाला होता. या शिवशाही बससाठी एसटीने आपल्या एशियाड या लोकप्रिय बँडला तिलांजली दिली होती. सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात वातानुकूलित बसमधून प्रवास अशी संकल्पना घेऊन भाडेतत्त्वावर सुमारे एक हजार शिवशाही त्यावेळी घेण्यात आल्या. सुरुवातीला भाडेतत्त्वावर या बस घेतल्याबद्दल रावते त्यांच्या निर्णयावर प्रचंड टीका झाली. विशेषतः एसटीच्या कर्मचाऱ्यांनी देखील शिवशाहीला विरोध केला होता. पुढे खाजगी चालकांना बस व्यवस्थित चालवता येत नाहीत. ते मद्यपान करुन बस चालवतात. बस मार्गात मध्येच बंद करुन झोपा काढतात. याबरोबरच बसच्या अपघाताचे प्रमाण देखील वाढले आणि शिवशाही वादात सापडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT