Shiv Sena MPs meeting file photo
मुंबई

Shiv Sena MPs meeting: शिंदेंची गुप्त बैठक आणि ८ खासदारांची नावे; अखेर ठाकरेंच्या शिलेदाराने मौन सोडलं, थेट लिहूनच दिलं!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली.

मोहन कारंडे

Shiv Sena MPs meeting

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षांतर करण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही माध्यमांनी बैठकीला उपस्थित असलेल्या खासदारांची नावे देखील जाहीर केली आहे. दरम्यान, बैठक झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळला आहे.

"मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला उभा चिरला तरी 'मातोश्री'ची निष्ठा संपणार नाही," असे सावंत यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एका कागदावर त्यांनी हे सर्व लिहून जाहीर केले आहे.

चार वर्षांपूर्वी बंड करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत आहेत. ठाणे येथे एका गुप्त आणि तटस्थ ठिकाणी झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सहा खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतला, अशी चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या खासदारांमध्ये मुंबईच्या दोन खासदारांची नावे समोर आली.

या चर्चा सुरू असतानाच आज ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "आम्ही मिंधे सोबत बैठक घेतली, असे माध्यमांनी छापलं आहे. अनिल देसाई यांच नाव छापल नाही. या बातमीचा कडाडून निषेध करतो. माझे सगळे मोबाईल तपासा, सगळे तुम्हाला देतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला उभा चिरला तरी मातोश्रीची निष्ठा संपणार नाही," असे सावंत म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्या एका फोन वर राजीनामा देणारा मी मंत्री होतो. असले घाणेरडे संस्कार आमच्यावर नाहीत. मला राजाभाऊ वाझे, ओमराजे यांचा फोन आला होता. ज्यांनी चुकीची बातमी दिली त्यांच्यावर कारवाई करणार आहे. बैठकीला कोण गेले त्यांचे फोटो छापावे. आमची २४ एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच्या आधी अशा बातम्या आणल्या जात आहेत. यामागे विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे, असे लिहून देत आहे," असे सावंत यांनी स्पष्टे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT