मुंबई

Shivrajyabhishek Din 2024 : इतिहासकारांच्या नजरेतून शिवराज्याभिषेक

मोहन कारंडे

[author title="अनिल पवार" image="http://"][/author]

युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवला गेलेला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674. या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि ते 'छत्रपती' झाले. याच दिवसापासून त्यांनी राजपत्रावर 'क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती' असे नामाभिधान सुरू केले आणि नवीन शक सुरू करत आपण युगप्रवर्तक शककर्ते आहोत, असे जाहीर केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे, 'शिवराज्याभिषेक'. गेल्या 350 वर्षांत समकालीन विद्वान, कवी, बखरकार, परकीय आणि आधुनिक इतिहासकारांनी या असामान्य ऐतिहसिक घटनेचे वर्णन व विश्लेषण आपापल्या द़ृष्टिकोनातून केले आहे.

'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मर्‍हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही' हे उद्गार आहेत शिवराज्याभिषेकाचा सोहळा याची देही याची डोळा पाहिलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांचे. कृष्ण नृसिंहासारख्या पंडितांनी आधीच समाजाच्या मनात न्यूनगंड पेरून ठेवला होता, 'या कलियुगात जगामध्ये क्षत्रियच शिल्लक नाहीत. मग, हिंदू समाजात राजा होईलच कसा?' अशी त्यांची मांडणी होती. त्यामुळे साहजिकच हिंदुस्थानची जनता दिल्लीश्वरालाच आपला पातशाह मानत होती. औरंगजेब हाच त्यांच्यासाठी दिल्लीश्वर होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सगळ्यात मोठा आघात कोणावर झाला असेल, तर तो बादशाह औरंगजेबावर! शिवराज्याभिषेकाच्या विधीने औरंगजेबाच्या पातशाहीलाच प्रश्नांकित केले. म्हणूनच मराठा पातशाह छत्रपती झाला, ही बाब सभासदांना 'असामान्य' वाटते.

सभासदांप्रमाणे हा विधी प्रत्यक्ष अनुभवणारे आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे दस्तुरखुद्द संभाजी महाराज! राज्याभिषेकाच्या विधीमध्ये ते युवराज या नात्याने सहभागी होते. छत्रपती संभाजी महाराज विरचित 'बुधभूषण' या ग्रंथातून त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचे आणि राजनीतीचे दर्शन तर घडतेच; पण ग्रंथातील काही निवडक श्लोकांतून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे थेट आणि अधिकृत वर्णनही आपल्यासमोर उभे राहते. खरे तर हा ग्रंथ राजनीतीबरोबर शिवराज्याभिषेकाचे महत्त्व सांगणारा दस्तावेजच ठरला आहे. शिवराज्याभिषेकाचे वर्णन करताना छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, 'विद्वज्जनांनी घालून दिलेल्या श्रौतधर्माचा अवलंब करून शिवाजी महाराजांनी रायगडावर स्वत:चा राज्याभिषेक करविला, छत्र-चामरे आदि राजचिन्हांसह ते प्रतिदिनी राजसिंहासनावर शोभून दिसू लागले.'

शिवरायांच्या समकालीन असलेल्या रामचंद्रपंत अमात्य यांना छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या कारकिर्दीत एक ग्रंथ रचण्याची आज्ञा दिली. तो ग्रंथ म्हणजे 'आज्ञापत्र'. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे आणि शिवराज्याभिषेकाचे वर्णन करताना रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रात म्हणतात, 'शहाण्णवकुळींचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपति म्हणविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. दिगंतविख्यात कीर्ति संपादिली.' रामचंद्रपंत अमात्यांनी केलेले हे वर्णन आज साडेतीनशे वर्षांनंतरही प्रस्तुत ठरते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार असणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिन्डन याने या सोहळ्याचा तपशीलवार वृत्तांत आपल्या डायरीत नोंदवला आहे. यामुळे राज्याभिषेकाची प्रत्यक्षदर्शीने नोंदवलेली अधिकृत हकीकत इतिहास अभ्यासकांना व वाचकांना उपलब्ध झाली. सुदैवाने ही डायरी आजही उपलब्ध आहे.

शिवराज्याभिषेकाचा दिनवार वैदिक विधी ज्या काशीस्थ पंडितांनी पार पाडला, त्यांनी शिवरायांची केलेली प्रशंसाही तितकीच मौलिक ठरते. शिवराज्याभिषेकापूर्वी साधारण 10 वर्षे आधी गागाभट्ट यांनी 'शिवराजप्रशस्ती'त महाराजांचे गुणसंकीर्तन करताना लिहिले आहे, 'दान करण्यासाठी द्रव्यार्जन, रक्षणासाठी वीरव्रत, सत्यासाठी मधूर वाणी आणि परमेश्वराच्या ध्यानासाठी मन:शुद्धी या सर्व गुणांमुळे शिवाजीराजे चक्रवर्तीपदास प्राप्त होतात.' शिवाजी महाराजांवर गागाभट्टांनी केलेले हे भाष्य 6 जून 1674 ला पूर्ण झाले. गागाभट्टांनी वैदिक विधी दिनवार कसे पार पाडावेत, याचे वर्णन करणारी 'राजाभिषेकप्रयोगः' नावाची संस्कृत पोथी सिद्ध केली होती. इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले वा सी. बेंद्रे यांनी या संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर करून समस्त मराठीजनांसाठी राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे वर्णन खुले केले आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे या घटनेकडे पाहताना लिहितात, 'राज्याभिषेक हे अंतिम साध्य नव्हे, तर ते एक साधन होते. वैदिक आणि तांत्रिक राज्यााभिषेक हे साधन, तर प्रजेचे स्वातंत्र्य व कल्याण हे साध्य! महाराजांनी वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक करून घेतले. दोन्ही राज्याभिषेकांतून त्यांनी आपल्या धार्मिक स्वातंत्र्याची उद्घोषणा केली.' इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, 'इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हतबल होऊन नष्ट झाले होते. विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक अवकळा प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदू समाज पडून होता. त्यात शिवराज्याभिषेकाने चैतन्य भरले. जिवंतपणा आणला. घटनात्मकद़ृष्ट्या खर्‍याअर्थाने स्वतंत्र, सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधान मंडळ हे या घटनेचे मुख्य अंग होते. राज्याभिषेकाने महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यावर कळस चढविला गेला.'

ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या घटनेकडे मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रातिनिधिक प्रतीक म्हणून पाहता येते. या घटनेकडे अनेक मान्यवर इतिहासकारांनी व विचारवंतांनी वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून पाहून तिच्यावर भाष्य केले आहे. ही भाष्ये कधी एकमेकांना पूरक, तर कधी छेद देणारी ठरतात. महाराष्ट्राच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांचा सूक्ष्म अभ्यास होण्याची गरज आहे. शिवचरित्राची ससंदर्भ आणि साधार मांडणी करणारे गाढे अभ्यासक ग. भा. मेहेंदळे म्हणतात, 'सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून कायद्याचे राज्य स्थिर आणि प्रभावी करण्यासाठी, त्या काळच्या पारंपरिक आणि सर्वमान्य प्रथेनुसार राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याला औपचारिक व अधिकृत मान्यता मिळविण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. राज्याभिषेकामुळे ती मान्यता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच पुढे त्यांच्या वारसांनाही मिळाली.' प्रसिद्ध इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी 'शिवराज्याभिषेक हा भारतीय अस्मितेच्या जागृतीचा प्रखर आणि यशस्वी आविष्कार होता' या शब्दांत या घटनेचे वर्णन केले आहे. या घटनेचे आणि स्वराज्याचे महत्त्व विशद करताना त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी लिहिले आहे, 'मुगली साम्राज्याचा विचार करता माझे स्वराज्य टीचभर असले तरी तो कोणत्याही मुगली सुभ्याचा भाग नव्हे. हे स्वयंशासित स्वंतत्र राज्य आहे. त्याचे अस्तित्व बादशाही कृपेच्या सनदेवर अवलंबून नाही, अशी व्यापक घोषणा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समारंभ साजरा करून केली.' नरहर कुरुंदकरांसारखे महान अभ्यासक व विचारवंत म्हणतात, 'शिवराज्याभिषेक हे सर्व भारतभर पसरलेल्या प्रजेला 'आपण तुमचे मुक्तिदाते आहोत, नेते आहोत आणि रक्षणकर्ते आहोत' असे शिवरायांनी दिलेले आश्वासन होते.' मूळचे पश्चिम बंगालचे असलेले सर जदुनाथ सरकार 'शिवाजी हिज लाइफ अ‍ॅन्ड टाईम्स' या शिवचरित्रात म्हणतात, 'शिवराय सोडले तर यापूर्वी कोणत्याही मराठा सरदाराच्या मनात स्वत:ला राज्याभिषेक करून घ्यावा, असा विचारसुद्धा आला नव्हता.' तर, डॉ. बाळकृष्ण म्हणतात, 'राज्याभिषेकाच्या निमित्ताने रयतेच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण करण्याचा महत्त्वाचा उद्देश महाराजांच्या मनात होता.

राज्याभिषेकामुळे शिवरायांना सार्वभौम राजा म्हणून जगन्मान्यता लाभली.' छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले विस्तृत चरित्र लिहणारे कृष्णराव अर्जुन केळूसकर म्हणतात, 'राज्याभिषेक विधीने स्वराज्य स्थापनेची पूर्तता करून महाराजांनी हिंदुपदपादशाहीची इमारत खंबीर पायावर उभारली व सतत तीस वर्षे केलेल्या अविश्रांत परिश्रमांची सार्थकता केली. राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे नेटके व्यवस्थापन करताना अष्टप्रधान मंडळाच्या बरोबरीने राजनीती, समाजनीती, अर्थनीती, मुलकी व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे लावली.'

SCROLL FOR NEXT