मुंबई ः हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय म्हणजे ‘जीआर’ काढला असला, तरी सातारा गॅझेटियर लागू करण्याचा आग्रह मनोज जरांगे यांनी धरला. त्यावर, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एका महिन्यात निर्णय घेऊ, असे स्पष्ट आश्वासन जरांगे यांना दिले.
आम्ही कोणाला मोजत नाही, तुम्ही राजे आहात, राजेंचा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही थांबायला तयार आहोत. मात्र, एका महिन्यात सातारा गॅझेटियरवर निर्णय घेण्याची जबाबदारी तुमची असेल. नाही तर आम्ही तुमच्या घरी येऊन बसू, असे जरांगे म्हणाले. आमची फसवणूक झाली, तर राज्यात एकही मंत्री आणि आमदार फिरू शकणार नाही, असा इशारा यावेळी जरांगेंनी दिला. त्यावर शिवेंद्रराजे भोसले यांनी जर तुमची फसवणूक करायची असती, तर मी समोरच आलो नसतो. तुम्हाला दिलेले शब्द निश्चितपणे पाळले जातील, असे जरांगेंना त्यांनी सांगितले. अखेर शिवेंद्रराजेंचा शब्द प्रमाण मानून जरांगेंनी सातारा गॅझेटियरवर सबुरीची भूमिका घेतली.
सगेसोयरे निर्णय नोंदींच्या छाननीनंतर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयर्यांनाही कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी केली होती. त्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 8 लाख हरकती आल्या असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी वेळ लागणार आहे, असेही ते म्हणाले. त्यावर जरांगेंनी संयमी भूमिका घेत वेळ देण्याची तयारी दाखविली.