मुंबई : मुंबईतील शिवडीचा राजा या मंडळाने ‘माय मरो मावशी जगो’ या मातृभाषेवर आधारित वास्तवदर्शी देखावा यंदा साकारला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिली.
शिवडीचा राजा या मंडळाची एक खास ओळख म्हणजे वास्तवदर्शी सामाजिक देखावे. आजवर मंडळाने अनेक सामाजिक विषयांवर देखावे साकारत आपली भूमिका सशक्तपणे मांडली आहे. यामुळेच मंडळाला शासनाचा ‘प्रथम क्रमांकाचा’ पुरस्कार व इतर गौरव प्राप्त झाले आहेत. आजच्या आधुनिकतेच्या लाटेत सामाजिक देखाव्यांची परंपरा हळूहळू मागे पडताना दिसत आहेत. प्रकाश योजना, तांत्रिक देखावे आणि मनोरंजनाच्या भरात समाजाशी जोडणारे संवेदनशील विषय बाजूला पडताना दिसत आहेत. मात्र; ‘शिवडीचा राजा’ मंडळाने परंपरेला तडा न जाऊ देता, यंदाही सामाजिक देखाव्यांची परंपरा जपली आहे.
मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा इतिहास सामाजिक देखाव्यातून साकारावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. या आवाहनाला शिवडीच्या राजा मंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मराठी भाषा आणि हिंदी सक्ती या ज्वलंत आणि समकालीन विषयावर आधारित ‘माय मरो, मावशी जगो’! हा वास्तवदर्शी देखावा साकारून मंडळाने मराठी भाषेच्या अस्तित्वाला आव्हान देणार्या प्रवाहाकडे व मराठी भाषेच्या अस्मितेवर चालून आलेल्या संकटाकडे लक्ष वेधले आहे.
मराठीच्या भूमीत, मराठीच्या मातीवर राहून सुद्धा, हिंदी सक्तीचे विष पसरवले जात आहे. शाळा, कार्यालये, शासकीय व्यवहार, अगदी दैनंदिन संवादातही मराठीला मागे सारून दुसर्या भाषेला प्राधान्य दिले जाते आहे. हा केवळ भाषेचा विषय नाही तर मराठी अस्मिता आणि संस्कृतीच्या अस्तित्वावरचा घाला आहे.
मंडळाने आपल्या देखाव्याद्वारे या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. हा देखावा फक्त कलात्मक नाही तर चेतावणीचा शंखनाद आहे. मराठीवर आलेल्या संकटाविरुद्ध जागृती करण्यासाठी उभारलेला समाजप्रबोधनाचा भक्कम प्रयत्न आहे. या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर आहेत.