Shiv Sena UBT pudhari photo
मुंबई

Shiv Sena UBT: राम मंदिरातील भ्रष्टाचाराविरोधात उबाठा रस्त्यावर; ५ जुलैला मुंबईत 'रामरक्षा महाआरती'

'रामरक्षा महाआरती' या अभियानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्याची मोहीम पक्षाने जाहीर केली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सहा खासदारांच्या पक्षत्यागानंतर पुढील राजकीय भूमिका काय असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अयोध्या येथील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेत राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. 'रामरक्षा महाआरती' या अभियानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्याची मोहीम पक्षाने जाहीर केली आहे.

या अभियानाची सुरुवात ५ जुलै रोजी मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीने होणार आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

उबाठाकडून राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली जाणार असून, "रामद्रोह, हिंदुद्रोह म्हणजेच देशद्रोह" अशी भूमिका पक्षाकडून मांडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

पक्षाच्या माहितीनुसार, मुंबईतील पहिल्या कार्यक्रमानंतर राज्यभर विविध ठिकाणी 'रामरक्षा महाआरती' आयोजित करण्यात येणार असून, भ्रष्टाचाराविरोधात जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सामूहिक आरत्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे राजकारण करत असून, आता राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उबाठा) राज्यभर आंदोलनाची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT