मुंबई

Shiv Sena UBT Split : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

अनुपस्थित आमदार पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा; बैठकीत घेतला राजकीय परिस्थितीचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी केलेले पक्षांतर आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक शिवालय येथे बोलविली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाकरिता रणनीती आखतानाच सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीलाही चार आमदार अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या. मात्र, सर्व आमदार पक्षाशी एकसंध असल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.

पक्षातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची सोमवारी बैठक बोलावली. नरिमन पाॅईंट येथील शिवालय या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत बदललेली राजकीय परिस्थिती तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीला २६ पैकी २२ आमदार उपस्थित तर ४ आमदार अनुपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील पक्षाची रणनीती, सरकारविरोधातील मुद्दे आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांविरोधात राजकीय लढा अधिक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

उद्धव ठाकरे हे स्वतः बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी दौराही केला. असेच दौरे अन्य पाच बंडखोरांच्या मतदारसंघातही केले जातील.

या खासदार फुटीनंतर पक्षाच्या आमदारांनी शिवसैनिक आणि पक्षाच्या पाठीराख्यांपर्यंत पोहोचावे. त्यांना पक्षात पुन्हा एकदा सक्रिय करून कामात जोडून घ्यावे आणि या बंडखोर खासदारांच्या पक्षांतराची लोकांना माहिती द्यावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

तसेच पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसह अन्य मुद्दे आक्रमकपणे मांडण्याच्या सूचनाही ठाकरेंनी दिल्या. दरम्यान, खासदारांच्या ऑपरेशन टायगरनंतर आमदारांमध्येही फूट घडवून आणण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेत पक्ष एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT