मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : मुंबई महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 125 ते 130 जागा लढायची इच्छा आहे. मुंबई महापालिकेत गेल्या वेळी निवडून आलेल्या शिवसेनेच्या 84 तील अर्ध्याहून जास्त नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीला ‘जय महाराष्ट्र’ करीत एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. शिवसेनेचे मुंबईतील स्थान खूप महत्वाचे आहे. शिवसेनेचा मतदार आमच्याकडे वळला हे माजी नगरसेवकांच्या प्रतिसादामुळे स्पष्ट होते आहे. त्यामुळे आम्हाला 227 पैकी 125 जागा लढायला मिळाव्यात अशी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची मागणी आहे.
भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर 82 जागा मुंबईत जिंकल्या होत्या. आता दोन्ही पक्ष एकत्र आले तर मोठा विजय मिळेल अशी शिंदे गटाची भूमिका आहे. पक्षाने मुंबईतील ज्येष्ठ नेत्यांची सुकाणू समिती स्थापन केल्यानंतर पुढच्या आठवडयात किंवा नवरात्रोत्सवाच्या शुभमुहुर्तात एकत्र बसायचे ठरवले आहे.
मुंबई महापालिकेत निवडणुका एकत्रितपणे लढण्याचे विधान भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे व्यूहरचना आखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि चर्चेसाठी बसतील असे समजते. भाजपनेही बैठकींना प्रारंभ केला आहे. नवरात्रात ही चर्चा आकार घेईल असेही सूत्रांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत कमी जागा लढूनही भाजपइतकेच यश आम्हाला मिळाले होते, स्ट्राईक रेट जास्त होता, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. जे नगरसेवक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले त्यांना संधी द्यावी लागेल, असेही गृहितक मांडले जाते आहे. शिंदेंकडे आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे प्रभाव क्षेत्र कोणते, तेथे कसे मतदान होईल अशी माहिती सध्या संकलित केली जात आहे. भाजपसमोर हा तपशील लवकरच मांडला जाईल, असेही एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.