Eknath Shinde Pudhari
मुंबई

Eknath Shinde: परिसीमन विधेयकाला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा जाहीर

संसदीय पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व खासदारांना रविवारीच दिल्लीला पोहोचण्याचे निर्देश.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या 'महिला आरक्षणाशी संबधित 'परिसीमन' विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शनिवारी शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या ऐतिहासिक निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

सर्व खासदार उपस्थित

मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग अप्पा बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते, तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि खासदार संजय दिना पाटील यांनी व्हिसीद्वारे उपस्थिती लावली.

विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा जागा ४८ वरून ७२ होतील. यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज अधिक बुलंद होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेचे १३ आणि राज्यसभेचे २ असे सर्व खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, असे ते म्हणाले.

१९७६ पासून मतदारसंघांची संख्या गोठवण्यात आली आहे. सद्यस्थितीत एका खासदाराला २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. त्यामुळे मतदारांना न्याय देण्यासाठी, तसेच गावे आणि शहरांच्या समतोल विकासासाठी मतदारसंघ पुनर्रचना करणे काळाची गरज आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT