मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळाल्याने हिरमोड झालेले शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तडकाफडकी उपनेते पद आणि विदर्भ समन्वय पदाचा राजीनामा दिला, तर माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा पत्ता कट केल्याने तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाठ फिरवली होती.
महायुती सरकार सत्तेच येताच, शिवसेनेतील आमदारांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केली होती. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र, मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आल्याने त्यांनी थेट उपनेते, विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. आमदारकी राजीनामा मात्र त्यांनी दिलेला नाही. तसेच, शिवसेनेच्या बाजूने यापुढे कोणतीही भूमिका मांडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर पहिल्या दहा मध्ये भोंडेकर शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. महायुती सरकारमध्ये मंत्री पदावर पुन्हा संधी मिळावी यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपने काही जणांच्या नावावर आक्षेप घेतला होता, त्यात या तिन्ही नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे तिन्ही माजी मंत्र्यांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. शपथविधीच्या दिवशीच तिघांचेही पत्ते कापल्याने तिघेही प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. तिघांची अनुपस्थिती चांगलीच चर्चेची ठरली होती.