Shiv Sena Dasara Melava 2025
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी दणक्यात होण्याची शक्यता आहे. कारण, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवसेनेच्या व्यासपीठावरून धडाडणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवाजी पार्कवर सभा घेण्यास बीएमसीकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याने चिंतेत आहे.
२ ऑक्टोबर रोजी दसरा असून दरवर्षीप्रमाणे या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जानेवारी २०२५ मध्येच मेळाव्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, दसरा तोंडावर आला असतानाही ठाकरे गट मेळावा परवानगीच्या प्रतिक्षेत आहे. जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरे गटाकडून जवळपास तीन वेळा परवानगीबाबत स्मरण पत्र देखील पालिकेला देण्यात आले. मात्र यावर पालिकेकडून काहीच उत्तर आले नाही. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी यंदाही शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
दुसरीकडे मात्र, शिवसेनेच्या मंचावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंची एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सचिन अहिर यांनी राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांनी मात्र ही शक्यता फेटाळली आहे. "दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला मेळावा असतो. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. भविष्यात काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. ६० वर्षांहून दसरा मेळावा फक्त शिवसेनेचाच आहे, असे राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.