मुंबई : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटाच्या शाखांमध्ये शिवसैनिकांची गर्दी वाढू लागली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनामुळे शिवसेनेपासून दुरावलेले ज्येष्ठ शिवसैनिकही शाखांमध्ये दिसू लागले असून त्यांनी निवडणुकीची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यामुळे मुंबईतील शाखा शिवसैनिकांनी गजबजून गेल्या आहेत. (Assembly Election)
मुंबई शहरात शिवसेना ठाकरे गटाइतकी पक्षबांधणी अन्य कोणत्याच पक्षाची नाही. मुंबईतील २२७ प्रभागांत ठाकरे गटाची शाखा नाही असे कुठे दिसूनच येणार नाही. एवढेच काय तर, आता ठाकरेंच्या आमदार, खासदार, माजी नगरसेवकांचीही स्वतंत्र कार्यालये दिसून येतात. पण ठाकरे गटामध्ये शाखेला फार महत्त्व आहे.
शाखा म्हणजे शिवसैनिकांसाठी मंदिरच आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून न चुकता सच्चा शिवसैनिक शाखेत आल्याशिवाय राहात नाही. प्रत्येक शिवसैनिक दररोज शाखेमध्ये ठेवलेल्या नोंदवहीमध्ये आपले नाव व सही करून, आपण आल्याची नोंद करतो. अशी पद्धत अन्य कोणत्याच पक्षात नाही. त्यामुळे मुंबई शाखांना विशेष महत्त्व आहे. कोणती निवडणूक असो, त्या त्या विभागाचे प्रमुख निवडणूक कार्यालय शाखाच असते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शाखांमध्ये शिवसैनिकांची मोठी गर्दी दिसून येते आहे.
विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर सर्व शाखांमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. यात ज्येष्ठ शिवसैनिकांसह महिलांचा मोठा सहभाग आहे. घरातील सर्व कामे सांभाळून महिला शिवसैनिक आवर्जून शाखेत रात्री उपस्थित राहात आहेत. प्रत्येकाला शाखाप्रमुखाच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात आली आहे.
उदाहरणार्थ मतदार यादीतील नावाप्रमाणे त्या त्या भागातील गटप्रमुखांना सांगून तेथील मतदारांशी संवाद साधणे, अनेकदा मतदार यादीत चुका आढळून येतात. त्या दुरुस्त करण्यासाठी मदत करणे, मतदारांच्या मतदान पावत्या वाटणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाणे,
मतदानासाठी किती मतदार उतरले याची नोंद करून जे उतरले नाहीत, त्यांना मतदानासाठी बाहेर काढणे व अन्य कामे केली जातात. त्याशिवाय त्या त्या विभागातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली असते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात काही अपवाद वगळता पैसे देऊन कार्यकर्ता आणायची गरज भासत नाही.