Shital Mhatre on Sanjay Raut :
मुंबई : "एवढी वर्षे मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी केली. आता काकांनी चाकरी आणि मातोश्रीने भाकरी बंद केली वाटतं? त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येताय," अशा शब्दांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी 'X' पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमधील वास्तव्याचे कारण स्पष्ट केले आहे.
"आम्ही ताज हॉटेलमध्ये फक्त जेवायला जात आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका, पण तिथे नगरसेवकांचा कोंडवाडा केल्याचे समजले," असा टोला लगावला होता. यावर शीतल म्हात्रे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत राऊतांचा समाचार घेतला आहे.
शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "एवढी वर्षे मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी केली. आता काकांनी चाकरी आणि मातोश्रीने भाकरी बंद केली वाटतं, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येताय. खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या!"
"आमचे जवळपास २० नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. हे सर्व नगरसेवक उबाठा गटाच्या उमेदवारांना हरवून निवडून आले आहेत. त्यांना महानगरपालिकेचे कामकाज आणि प्रक्रियांची पुरेशी माहिती नाही. त्यांना या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही दोन दिवसीय शिबिर आयोजित केले आहे," असे स्पष्टीकरण म्हात्रे यांनी दिले आहे.
"महायुती ही बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. हा केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केलेला खटाटोप नाही. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढलो आणि जिंकलो आहोत. पाठीत खंजीर खुपसण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात महायुतीचीच सत्ता येईल आणि महापौरपदाचा निर्णय महायुतीचे ज्येष्ठ नेते घेतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.