Another phase of the northern route of the coastal road project will open
मुंबईतील सतरासह तब्बल १२६ जागांवर शिंदे सेनेचा दावा  File Photo
मुंबई

मुंबईतील सतरासह तब्बल १२६ जागांवर शिंदे सेनेचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा जागावाटपासाठी महायुतीमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या पहिल्याच फेरीत जबरदस्त चुरस निर्माण झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल १२६ जागांवर दावा केला असतानाच, भाजपही १६० ते १७० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, जागावाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.=

गुरुवारीच मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १६० ते १७० जागा लढवण्याचा विचार झाला. या दोन दाव्यांची बेरीज केली तर महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला जेमतेम ८-१० जागा उरतात. या गटानेही ८० ते ८५ जागा लढवण्याची भाषा आधीच सुरू केलेली आहे.

महायुतीचे दोन घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्या स्वतंत्र बैठका गुरुवारी मुंबईत झाल्या. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी झाली. सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जागावाटपावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे १०३ आमदार असले तरी अपक्ष आणि छोट्या मित्र पक्षांना सोबत घ्यायचे असल्याने भाजपने १६० ते १६५ जागा लढवाव्यात, असा सूर या बैठकीत उमटला.

कोअर कमिटीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संजय कुटे, पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती होती.

जागा वाटपाचा निर्णय नाही : दानवे

भाजपच्या मॅरेथॉन बैठकीनंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना सांगितले की, महायुतीमध्ये कोणीही अजून जागांची मागणी केलेली नाही. जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांची नेते एकत्र बसून त्याबाबत अंतिम निर्णय घेतील.

वर्षा बंगल्यावर बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बालेकिल्ले असलेले १७ मतदारसंघ शिंदे गटाने भाजपकडे मागण्याचे ठरवले आहे. लोकसभा निवडणुकीत १३ ठिकाणी आमने-सामने लढलेल्या शिवसेनेचे दोन्ही गट विधानसभा निवडणुकीतही किमान १७ ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, असा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत सव्र्व्हेच्या नावाखाली भाजपने आपल्या विद्यमान खासदारांना तिकीट देऊ दिले नाही. त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपकडून सव्र्व्हेचा अहवाल आपल्यापुढे मांडला जाईल. त्याकडे दुर्लक्ष करावे, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी वर्षावरील या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.

शिंदे गटाला कोणत्या जागा हव्यात ?

ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील ३६ पैकी २५ जागा लढण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि काँग्रेसकडून किती जागा सोडल्या जातील, यावर या जागा ठाकरेंना मिळणे अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाने १७ जागांची मागणी करून उबाठा आणि भाजपाचाही राजकीय रक्तदाब वाढवला आहे. भायखळा, वरळी शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागठाणे, चांदिवली आणि कलिना या जागांची आग्रही मागणी शिंदे शिवसेनेने केली आहे

SCROLL FOR NEXT