पुढारी ऑनलाईन डेस्क: विधान परिषदेचे पाच सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी महायुतीच्या पाचही उमेदवारांची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाकडून आज (दि.१७) उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संजय खाेडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती असून, अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत. यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवार १६ मार्च रोजी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार दादाराव केचे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना संधी देण्यात आली आहे.
रिक्त झालेल्या पाचपैकी तीन जागा भाजप लढवणार आहे. प्रत्येकी एक जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे असेल. विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपसह महायुतीच्या सर्व जागा हमखास निवडून येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत आहेत.
भाजपने उमेदवारी दिलेले संदीप जोशी नागपूरचे माजी महापौर आहेत. यापूर्वी त्यांनी विधान परिषद निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. विद्यमान आमदार असूनही २०२४ च्या विधानसभेला त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर केचे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. संजय केनेकर हे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असून ते छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.