मुंबई: देशभरात प्रचंड गाजलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाच्या खटल्याशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे शोधूनही उपलब्ध होत नसल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिल्यानंतर खळबळ उडाली आहे.
याची गंभीर दखल घेत न्यायालयाने कागदपत्रे उपलब्ध का नाहीत, त्यांचा शोध घेण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले आणि पुढील कार्यवाही काय आहे, याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या या बहुचर्चित खटल्यात नवा पेच निर्माण झाला आहे.
एप्रिल २०१२ मध्ये शीना बोरा बेपत्ता झाल्यानंतर काही महिन्यांनी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोडे परिसरात एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळला होता. त्यावेळी तिची ओळख पटली नव्हती. ऑगस्ट २०१५ मध्ये बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झालेल्या इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याच्या चौकशीतून शीना बोरा हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी या तपासाची सूत्रे स्वतः हाती घेतली होती. खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी वारंवार तेथे भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा माजी पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांची खार पोलीस ठाण्यात सखोल चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी अल्पावधीतच या रहस्यमय हत्या प्रकरणाचा उलगडा केला आणि या तपासामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई पोलिसांकडे लागले होते.
तपास सीबीआयकडे; पीटर मुखर्जीही अटकेच्या जाळ्यात
सप्टेंबर २०१५ मध्ये हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआयने पुराव्यांचे पुनर्मूल्यांकन केले आणि स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर मुखर्जी यालाही कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून नोव्हेंबर २०१५ मध्ये अटक केली.
त्यानंतर सीबीआयने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सध्या या प्रकरणाचा खटला सुरू आहे. सध्या इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना हे जामिनावर आहेत, तर चालक श्यामवर राय हा सरकारी साक्षीदार बनून न्यायालयात साक्ष देत आहे. देशातील सर्वाधिक गाजलेल्या हत्या प्रकरणांपैकी एक असलेल्या या खटल्यात आता काही महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा मुद्दा समोर आल्याने त्याचा खटल्यावर काय परिणाम होणार याकडे लक्ष लागले आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणाचा प्रवास
▪ एप्रिल २०१२ : शीना बोरा बेपत्ता; रायगडच्या गागोडे जंगलात जळालेला मृतदेह सापडला, मात्र ओळख पटली नाही.
▪ ऑगस्ट २०१५ : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झालेल्या चालक श्यामवर रायच्या चौकशीतून हत्या प्रकरणाचा उलगडा; इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना अटकेत.
▪ खार पोलीस ठाण्यात गुन्हा
▪ सप्टेंबर २०१५ : तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग.
▪ नोव्हेंबर २०१५ : सीबीआयने पीटर मुखर्जीला सहआरोपी म्हणून अटक.
आरोपींची सद्यस्थिती
▪ इंद्राणी मुखर्जी : मुख्य आरोपी; सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जामीन मंजूर.
▪ पीटर मुखर्जी : स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी;
▪ २०२० पासून जामिनावर.
▪ संजीव खन्ना : सहआरोपी; जामिनावर.
▪ श्यामवर राय : सरकारी साक्षीदार .
प्रकरण का गाजले?
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी असून तिला अनेक वर्षे सार्वजनिकरीत्या बहीण म्हणून सादर करण्यात आल्याचा तपासातील दावा समोर आला होता. उच्चभ्रू कुटुंब, गुंतागुंतीचे कौटुंबिक संबंध, कथित आर्थिक व वैयक्तिक वाद आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये मिळालेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे हे प्रकरण देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी खटल्यांपैकी एक ठरले. आता महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा मुद्दा समोर आल्याने या बहुचर्चित खटल्याकडे पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.