शरद पवार, उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने File Photo
मुंबई

Fadnavis praised by rivals : शरद पवार, उद्धव ठाकरे यांची फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने

दोन्ही कट्टर विरोधकांनी फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीसाठी सदिच्छा दिल्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पावसाळी अधिवेशनात धुवाधार बरसलेल्या राजकीय विरोधकांच्या सरी ओसरल्या आणि अधिवेशनानंतर तीनच दिवसांनी आलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस खासकरून विरोधकांकडून राजकीय अभीष्टचिंतनाचा वर्षाव करणारा ठरला. मुख्यमंत्री फडणवीस हे ज्या पद्धतीने कष्ट उपसत असतात ते कष्ट पाहून फडणवीस थकत कसे नाहीत, असा प्रश्न मलाही पडतो. त्यांचा कामाचा झपाटा पाहिला की, माझा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तो काळ आठवतो, असे उद्गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार यांनी काढले. तर, फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकिर्दीत महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली, असे कौतुक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या दोन्ही कट्टर विरोधकांनी फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीसाठी सदिच्छाही दिल्या, हे विशेष!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र नायक’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, योगेश सागर, मंगेश चव्हाण, देवयानी फरांदे, अनुप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

या कॉफीटेबल तथा गौरव ग्रंथात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नेते नितीन गडकरी, अभिनेता आमीर खान यांच्यासह विविध मान्यवरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुुणगौरव केला असून, त्यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.

पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल फडणवीस यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे; विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून मी फडणवीस यांच्याकडे पाहतो. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभीष्टचिंतन शरद पवार यांनी आपल्या लेखाच्या सुरुवातीलाच केले आहे. फडणवीस यांना राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले, तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे, अशी नि:संदिग्ध ग्वाही शरद पवार देतात.

फडणवीस यांची मजबूत पकड

देवेंद्र फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो, असेही शरद पवार यांनी नमूद केले आहे.

फडणवीस स्वयंभू होवोत

सध्याचे राजकारण ही सततची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डाव, प्रतिडाव, कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. मतभेदांनी टोक गाठले आहे. त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रियात्मक कार्यासाठी ऊर्जेचा व्यय होतो. त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो. राजकीय स्थैर्यप्राप्ती नाही, तर जनहित हे राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय आखाड्याबाहेरील क्षितिजे अधिकाधिक पार करावीत, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी लेखातून व्यक्त केली आहे. देशहितासाठी त्यांचे योगदान लाभो, महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी फडणवीस अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छाही शरद पवार यांनी दिल्या आहेत.

फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगती ः उद्धव ठाकरे

याच गौरव ग्रंथात फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शब्दांची कोणतीही काटकसर केलेली नाही. उद्धव म्हणतात, फडणवीस यांचा स्वभाव आणि कायदेशीर, आर्थिक, तसेच प्रशासकीय विषयांवरील त्यांचे सखोल ज्ञान त्यांना भाजपमधील इतर नेत्यांपासून वेगळे ठरवते. फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली. राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणीचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दीपणाने या आव्हानांचा सामना केला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकिर्दीत महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली.

‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारख्या योजनांतून त्यांच्या पक्षात त्यांची विश्वासार्हता वाढली. फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, त्यांचा अभ्यास, स्वभाव आणि प्रशासकीय कौशल्य पक्षाला उपयुक्त ठरेल. फडणवीस यांची प्रतिमा एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा, यामुळे त्यांचे स्थान द़ृढ आहे. भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या मनातील योजनांत यश मिळो, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

राज्यपालांकडून गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतिपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या प्रकाशनप्रसंगी केले. राज्यपाल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘जलयुक्त शिवार अभियान’सारखी क्रांतिकारी योजना राबवण्यात आल्याने 22 हजारांवर गावांमध्ये जलसुरक्षा प्राप्त झाली. नागपूर-मुंबई शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग साकारला गेला. मुंबई मेट्रोचे विस्तार प्रकल्प, अटल सेतू आदीमुळे शहरी व ग्रामीण विकासाला चालना मिळाली.

राज्यात सामाजिक परिवर्तनाच्या द़ृष्टीने ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान आणि दुर्बल घटकांसाठी सीएसआरअंतर्गत प्रभावी उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम - दावोस’मधील सहभागामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळाली, ज्यामुळे 15 लाख कोटी रुपयांहून अधिक सामंजस्य करार झाले. कधीकाळी नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्हा आज ‘स्टील डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया’ म्हणून ओळखला जातो, या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय फडणवीस यांना जात असल्याचेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राच्या नवपरिवर्तनाचे ‘महाराष्ट्र नायक’ आहेत. सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशी देदीप्यमान कारकीर्द असणारे फडणवीस हे कुशल संघटक, अभ्यासू प्रशासक, धुरंदर राजकारणी, कायदेतज्ज्ञ, स्पष्ट वक्ते, लढवय्ये आहेत, असे महाजन यांनी यावेळी सांगितले.

उमदा विकास पुरुष ः आमीर खान

अभिनेता आमीर खान यांनीही आपल्या गौरवपूर्ण लेखात फडणवीस यांना उमदा विकास पुरुष म्हणून संबोधले आहे. आमीर खान म्हणतात, महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी वाटेल ते करण्याची फडणवीस यांची तयारी असते, हे मी चांगले अनुभवले आहे. कोणतीही अडचण नीट समजून घेणे आणि त्यावर व्यवहारिक तोडगा काढणे, यात त्यांचा हातखंडा आहे. अत्यंत कुशाग्र बुद्धी, कमालीचा संयम, समतोल वृत्ती, व्यवहारिक तरीही अत्यंत संवेदनशील अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. ‘बोले तैसा चाले,’ असे त्यांचे वागणे आहे. त्यांनी आश्वासन दिले आणि ते झाले नाही, असे कधी घडले नाही. फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला उमदा विकास पुरुष लाभल्याची भावना आमीर खान व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT