मुंबई : स्वयं पुनर्विकास संकल्पना ही अतिशय चांगली असून यामधून मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि स्वयं पुनर्विकास योजनेच्या संकल्पनेची माहिती त्यांना दिली. त्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. स्वयं पुनर्विकास योजनेसाठी मोठा निधी उभारावा लागेल, एलआयसी आणि इतर मोठ्या महामंडळांकडून निधी उभारणीसाठी मी स्वत: प्रयत्न करीन, त्यासाठी दिल्लीत बैठकही घेऊ, असा शब्दही शरद पवार यांनी या भेटीत प्रवीण दरेकर यांना दिला.
कोल्हापुरात 5 नोव्हेंबर रोजी पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या व्यासपीठावर शरद पवार यांनी दरेकरांकडे स्वयं पुनर्विकास संकल्पनेविषयी चौकशी केली होती. समक्ष भेट घेऊन स्वयं पुनर्विकास योजनेची पूर्ण माहिती देतो, असे दरेकरांनी त्यांना सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी प्रवीण दरेकर सिल्व्हर ओकवर दाखल झाले.
शरद पवारांशी तासभर झालेल्या चर्चेत दरेकर यांनी आतापर्यंत पूर्ण झालेले 16 स्वयं पुनर्विकास प्रकल्प, शासनाने दिलेल्या सवलती, निधीची उभारणी, सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, दरेकर समितीने तयार केलेला अहवाल, शासनाने स्थापन केलेले समूह/स्वयं पुनर्विकास प्राधिकरण, स्वयं पुनर्विकास प्रकल्पातील अडचणी यासंदर्भातील सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजाश्रय देत स्वयं पुनर्विकास योजनेसाठी प्राधिकरण स्थापन केले आणि या योजनेला गती येऊ लागली आहे. आज शरद पवार यांनी स्वयं पुनर्विकास संकल्पनेविषयी माहिती घेण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. तासभर वेळ देत त्यांनी स्वयं पुनर्विकासाबाबत अतिशय बारकाईने माहिती घेतली. स्वयं पुनर्विकास योजनेतून सर्वसामान्य माणसाला मोठी जागा मिळेलच, पण मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद स्वयं पुनर्विकास संकल्पनेत आहे, ही त्यांची प्रतिक्रिया आणि सर्व मदत करण्याचे आश्वासक शब्द आम्हाला ऊर्जा देणारे आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, भाजपा विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.