मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत 2004 आणि 2019 मधील मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. 2004 साली अजित पवार नवखे होते. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत नव्हते. छगन भुजबळ किंवा अन्य नेत्यांकडे हे पद दिले असते तर पक्ष फुटण्याचा धोका होता, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या प्रयोगात 2019 साली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. मात्र त्यांचे नाव आमच्यापर्यंत आलेच नाही. शिवसेनेतच त्यांच्या नावाबाबत अंतर्गत चर्चा झाली होती. त्याची माहितीही आम्हाला नंतर मिळाली. त्यांच्या नावाला आमची काहीच हरकत नव्हती. मात्र, शिवसेनेनेच त्याबाबत पुढाकार घेतला नाही, असे अनेक खुलासे शरद पवार यांनी या मुलाखतीत केले आहेत. 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले असतानाही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले होते. यासंदर्भात होणार्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट केला.
मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचे नाव चर्चेतच नव्हते. ते तेव्हा नवखे होते. छगन भुजबळ किंवा इतर काही नावे चर्चेत होती. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र राहिला नसता. पक्षात फूट पडली असती. त्यामुळे महत्त्वाची खाती घेऊन मुख्यमंत्रिपद काँग्रेस पक्षाला द्यावे लागले, असे पवार यांनी सांगितले. दुसरीकडे 2019 साली महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री निवडीचा किस्साही शरद पवारांनी या मुलाखतीत सांगितला. एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती. त्यांच्या नावाबाबत शिवसेनेत अंतर्गत चर्चा झाली याची आमच्याकडे माहिती नव्हती. त्यांच्या नावाची शिवसेनेत चर्चा झाली होती हे आम्हाला हळूहळू नंतर लक्षात आले, असेही पवार म्हणाले.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी विरोध केल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता. त्यामुळे आता शरद पवार यांनीच यासंदर्भात खुलासा करत आमची त्यांच्या नावाला हरकत नव्हती, असे सांगितल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटात नव्याने दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.