मुंबई: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी सोने खरेदी टाळण्याबाबत केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या आवाहनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली असून केंद्र सरकारने सर्वपक्षीय सहमतीने असा निर्णय घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली आहे.
सोने खरेदी, वाहन प्रवास टाळण्याबाबतच्या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक असून राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर सर्वपक्षीय सहमतीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. कारण देशहिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून सध्याच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेण्याची आवश्यकता आहे. पुढील आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयांबाबत व्यापक विचारविनिमय झाला पाहिजे, अशी सूचनाही पवार यांनी केली. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे हेच सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी भावनाही शरद पवार यांनी व्यक्त केली.