Sharad Pawar file photo
मुंबई

Sharad Pawar NCP: शरद पवारांची राष्ट्रवादी शेवटच्या राज्यातही सत्तेतून बाहेर; मंत्र्यासह आमदाराचाही पराभव

केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

मोहन कारंडे

Sharad Pawar NCP Kerala election results 2026

मुंबई: केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का दिला आहे. या निकालांमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आता देशातील शेवटच्या राज्यातूनही सत्तेबाहेर पडली आहे. केरळमधील एलडीएफ (LDF) सरकारमध्ये सहभागी असलेला हा पक्ष आता एकाही जागेवर विजय मिळवू शकलेला नाही.

आघाडीत लढूनही पाटी कोरीच

केरळमध्ये शरद पवार यांच्या पक्षाने डाव्या लोकशाही आघाडीसोबत (LDF) निवडणूक लढवली होती. आघाडीच्या जागावाटपात पक्षाच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. मात्र, या तिन्ही जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामुळे विधानसभेतील पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

मंत्री आणि आमदारांना जनतेने नाकारले

या निवडणुकीत पक्षाला सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांच्या विद्यमान मंत्र्याचा झालेला पराभव. केरळच्या एलाथूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा रिंगणात उतरलेले माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री ए.के. ससींद्रन हे काँग्रेसच्या ॲड. विद्या बालकृष्णन यांच्याकडून पराभूत झाले. २०११ मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून ससींद्रनच हे आमदार होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ससींद्रन यांनी अपक्ष उमेदवार झुल्फिकार मयूरी यांचा ३८,५०२ मतांनी पराभव करत ही जागा जिंकली होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीमध्येही ससींद्रन यांनी जेडीयूचे किशन चंद यांचा २९,०५७ मतांच्या बहुमताने पराभव करून ही जागा आपल्या नावे केली होती.

राष्ट्रवादीचे आणखी दोन विद्यमान आमदार देखील पाराभूत झाले. कुट्टानाड विधानसभा मतदारसंघात थॉमस के. थॉमस यांचा काँग्रेसचे रेजी चेरियन यांनी पराभव केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत थॉमस के. थॉमस ५,५१६ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. तर केरळ काँग्रेसचे ॲड. जेकब अब्राहम ५१,८६३ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

मलप्पुरम विधानसभा मतदारसंघातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. मुजीब रहमान यांचा पराभव झाला. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे पी.के. कुन्हालिकुट्टी यांनी ही जागा जिंकली. शरद पवार यांच्या तिन्ही उमेदवारांना मिळून निवडणुकीत एकूण १ लाख ४७ हजार ७९९ मते (०.६८ टक्के मते) मिळाली असून पक्ष राष्ट्रीय पातळीवर देशात कुठेही सत्तेत नाही.

काँग्रेस उद्या विधिमंडळ नेता निवडणार; निरीक्षकांची घोषणा

केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा केली आहे. अजय माकन आणि मुकुल वासनिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार आहेत. उद्या काँग्रेस पक्षाची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत निरीक्षक आमदारांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. विधिमंडळ दलाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT