Sharad Pawar : सुप्रिया सुळे आठवण शेअर करत म्हणाल्या, “तुतारीचा निनाद… “ Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : सुप्रिया सुळे आठवण शेअर करत म्हणाल्या, “तुतारीचा निनाद… “

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार' या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. 'तुतारी' पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर शऱद पवार गटाकडून जोरदार त्याच ब्रॅंडिग होवू लागलं. तर अजित पवार गटासह इतर महायुतीकडून आरोप-प्रत्यारोप होवू लागले. नुकतचं किल्ले रायगडावर या चिन्हाचे अनावर झाले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या आंदोलनाची आठवण सांगणारी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, " तुतारीच्या निनाद तेंव्हाही होता; तेंव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग'." (Sharad Pawar)

Sharad Pawar : फुंकले होते संघर्षाचे रणशिंग

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या 'X' खात्यावर शरद पवार यांची आठवण सांगितली आहे. एक फोटो शेअर करत त्यांच्यावर पहिला गुन्हा कधी दाखल झाला ती आठवण सांगत म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आदरणीय पवार साहेबांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली. जवळपास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा हा पल्ला शेतकरी बांधवांनी आदरणीय साहेबांच्या सोबतीने पायी पार केला. पुढे नागपूर येईपर्यंत या दिंडीचे रुपांतर प्रचंड अशा जनसमुदायात झाले. देशपातळीवरील नेते या दिंडीत सहभागी झाले. यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, कर्पुरी ठाकूर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, राजेश्वर राव, चंद्रजित यादव, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे आदी सहभागी झाले होते.

याखेरीज कलाक्षेत्रातील संवेदनशील कलाकारांनी देखील या दिंडीला पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. यामध्ये डॉ. श्रीराम लागू, गोदाताई परुळेकर,ना. धों. महानोर आदी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या दिंडीमुळेच आदरणीय पवार साहेबांवर पहिला गुन्हा दाखल झाला. अमरावतीहून दिंडित सहभागी झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांसह त्यांना पोहरा येथे अटक करुन भंडाऱ्यातील डाक बंगल्यावर नेण्यात आले. परंतु त्यांची लवकरच सुटका झाली आणि ते सर्वजण पुन्हा शेतकरी दिंडित सहभागी झाले. हि दिंडी म्हणजे एक प्रखर असे जनआंदोलन होते. या आंदोलनाच्या रेट्यामुळेच तत्कालिन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले साहेबांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहिर केला. हे छायाचित्र त्या जनआंदोलनाची सुरुवात झाली तेंव्हाचे…'तुतारीचा निनाद तेंव्हाही होता; तेंव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग'"

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावे आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. या निर्देशांचे पालन करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 'तुतारी' हे निवडणूक चिन्ह दिले. नुकतच किल्ले रायगडावर या चिन्हाचे अनावरण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT