मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने १७ उपाययोजना कराव्यात, दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून या अधिवेशनात झालेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी. नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा व दिवाळीपूर्वी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरीत करण्यात यावी, अशीही मागणी केली.
दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची रविवारी दुपारी सिल्व्हर ओकवर बैठक बोलावली. वंचित राहिलेले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावेत, संपूर्ण जमीन महसूल माफ करावा.
कर्जमाफी झालेल्या तारखेनंतर ज्या शेतकऱ्यांनी शेती व शेती व्यवसायाशी निगडित घेतलेली विविध संस्थांकडील व योजनेसाठी घेतलेली कर्जे आणि महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम संपूर्णपणे माफ करण्याची मागणी केली. कृषिपंपांची सर्व वीजबिले माफ करतानाच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृह फी आणि मेस फी संपूर्णपणे माफ करण्याची मागणी केली आहे.
रोजगार हमी योजनेतून मागेल त्या ठिकाणी तीन किलोमीटरच्या परिसरात रोजगाराची कामे सुरू करण्यात यावीत. पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत. टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करू नये, तसेच दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग करू नये.
शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब २५ किलो धान्य सरसकट मोफत देण्यात यावे. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांकडील पशुधनासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी केली.