Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: कार्यकाळ मोजून तुलना करणे चुकीचे; पंडित नेहरू आणि मोदींच्या तुलनेवरून शरद पवार यांची भाजपवर टीका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्या पदाची प्रतिष्ठा आम्ही राखतो. पण कार्यकाळ मोजून पंडित नेहरूंच्या कर्तृत्वाची तुलना मोदी यांच्याशी करणे चुकीचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले, पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरू देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले, अनेक वर्षे तुरुंगात राहिले. त्यांनी देश संघटित केला आणि शून्यातून आधुनिक भारताची निर्मिती केली. पण काही पक्ष कार्यकाळाचे दिवस मोजून नेहरूंच्या कर्तृत्वाची तुलना मोदी यांच्याशी करत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शून्यातून भारत निर्माण केला आहे. पण काही लोक देशात मोदी यांच्यासारखा नेता झालाच नाही, असे सांगत आहेत.

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पंजाबमधील 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला काळा दिवस म्हणत इंदिरा गांधी यांच्यावर पंजाबमध्ये जाऊन टीका केली होती. यावर पवार म्हणाले, हे विधान देशाची बेअब्रू करणारे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीख समाजाचे योगदान मोठे आहे.

मात्र तत्कालीन परिस्थितीत काही चुकीच्या विचारसरणीमुळे लष्करप्रमुख आणि देशाच्या पंतप्रधानांची हत्या झाली. इंदिरा गांधींनी देशाला संघटित केले, पाकिस्तानला धडा शिकवून बांगलादेशची निर्मिती केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले.

भूतकाळातील या दुःखद गोष्टी आता विसरून पुढे जाण्याची गरज असताना, राज्याचे मंत्री राजकारण करत आहेत. हे देशाच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य आहे.प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यातील शेतकरी व युवक हे सरकार विरोधातील आंदोलनाचे केंद्रबिंदू असतील. त्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संविधान, लोकशाही संस्था आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पक्ष रस्त्यावर उतरून लढत राहील, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT