Sharad Pawar file photo
मुंबई

Political News: विलीनीकरणाचे प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडून; एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असताना चर्चा

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली होती, अशी माहिती दोन्ही काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई: काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नसल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडून देण्यात आले होते. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली होती, अशी माहिती दोन्ही काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने या विषयावर तेव्हा चर्चा केली होती. या प्रस्तावाला शरद पवार यांची संमती होती. पण गेल्या १२ वर्षांत बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे यावर अंतिम निर्णय झाला नाही.

अजित पवार यांनी बाहेर पडून आपल्या नेतृत्वाखाली वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हाही यावर शरद पवार राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाचा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवण्यात आला होता. काँग्रेसचे नेतृत्व पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरण करण्यासाठी आग्रही होते. मात्र भाजपला फायदा व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ते होऊ दिले नाही. सध्या हे नेते सुनेत्रा पवार गटात आहेत, असे काँग्रेसचे नेते बोलत आहेत.

आम्हाला काँग्रेसमध्ये गेलो तर राजकीय भविष्य आहे, असे शरद पवार गटाच्या आमदारांना वाटत आहे. सुनेत्रा पवार गट हा महायुतीत सत्तेत असेपर्यंत तरी शरद पवार गटासोबत विलीनीकरण करणार नाही, असे शरद पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे २०२९ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी करायची असेल तर काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबत निर्णय झालेला बरा, असे या नेत्यांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT