महायुतीचे सरकार शिवद्रोही; शिवपुतळा दुर्घटनेवरून पवार, ठाकरेंचा हल्लाबोल  
मुंबई

महायुतीचे सरकार शिवद्रोही; शिवपुतळा दुर्घटनेवरून पवार, ठाकरेंचा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने रविवारी राज्य सरकारविरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढला व जोडे मारो आंदोलन केले. यावेळी सरकारवर जोरदार हल्ला चढविण्यात आला.

पुतळा कोसळणे हा शिवछत्रपतींचा अपमान आहे. या घटनेला महायुतीचे सरकार जबाबदार आहे. हे सरकार शिवद्रोही असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

हुतात्मा चौकातून सुरू झालेल्या या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार शाह महाराज, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी नेते सामील झाले होते.

सकाळी हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गेटचे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चावेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

माफी कशी मान्य होणार? : उद्धव ठाकरे

छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त आहेत. मात्र या घटनेची माफी मागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मयुरी दिसत होती. चेहऱ्यावर मयुरी ठेवून मागितलेली माफी जनतेला मान्य कशी होईल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली की, भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली? की भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली, असा खोचक सवालही त्यांनी केला.

भ्रष्टाचारामुळे पुतळा कोसळला : पवार

पुतळा कोसळण्याची ही घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला, असे विधान मुख्यमंत्री आणि महायुतीच्या अन्य नेत्यांनी केले, मात्र गेटवे ऑफ इंडिया वेथील महाराजांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून तसाच उभा आहे. राज्याच्या अन्य भागांतही असे अनेक पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत, असे पवार म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान : शाहू महाराज यांची टीका

खासदार शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनतेत संताप आहे. हा महाराजांचा व संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

कमिशनखोरीने शिवरायांचा अवमान: नाना पटोले

नाना पटोले यांनी भाजप सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप केला. मालवणमधील घटनेने फक्त शिवरायांचा पुतळाच पडला नाही, तर या भ्रष्टाचारी सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रही धर्म पायदळी तुडवला गेला आहे, असे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT