मुंबई : गिरगावची शांताराम चाळ म्हणजे जनजागृतीसाठी हक्काचं व्यासपीठ. या चाळीत स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्यासाठी ३५ पेक्षा जास्त सभा झाल्या. लोकमान्य टिळक, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना अशा ३० पेक्षा जास्त स्वातंत्र्य सेनानीना ब्रिटिश सरकारविरुद्ध बोलण्यासाठी ही चाळ हक्काचे व्यासपीठ होती. हा संपूर्ण इतिहास आता 'शांताराम चाळीची स्मरणगाथा' या पुस्तकातून उलगडणार आहे.
गणेशोत्सवासंबंधी मेळे, शिवजयंतीनिमित्त सभा, असहकार चळवळ, रौलट निषेध, स्वदेशी, पैसा फंड, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा महत्त्वाच्या झालेल्या सभांमधून पडद्याआड गेलेला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास 'शांताराम चाळीची स्मरणगाथा' या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा जीवंत होणार आहे. बेडेकर सदन, शांताराम चाळ, मालिनी ब्लॉक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, गिरगाव यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त अनघा बेडेकर यांचा हा ग्रंथ बुधवारी गिरगावच्या बेडेकर सदनमध्येच वाचकांच्या हाती पडणार आहे.