मुंबई : ज्या ‘मेघदूत’ बंगल्यात जन्म झाला, बालपण गेले, त्या बंगल्यात मंत्री म्हणून प्रवेश करताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांना हा क्षण पाहताना आनंदाश्रू रोखता आले नाहीत.
‘मेघदूत’ या शासकीय बंगल्यात शंभूराज देसाई यांचे बालपण गेले आहे. आजोबा बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ‘मेघदूत’ बंगला मिळाला होता. आजोबांनंतर 55 वर्षांनंतर नातू मंत्री म्हणून त्याच बंगल्यात राहायला आल्याने माय-लेकांना गलबलून आले. आपल्या मातोश्रींसह गृहप्रवेश करताना त्यांचे डोळे पाणावले.
संपूर्ण देसाई कुटुंब भावुक झाले. विजयादेवी देसाई यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शंभूराज देसाई याचा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला जिल्हाधिकारी करायचे होते. मात्र, तो आज त्यापेक्षा मोठा झाला. आमदार झाला, मंत्री झाला, असे विजयादेवी देसाई म्हणाल्या. आम्हाला ‘पावनगड’ बंगला मिळाला होता; पण मी ‘मेघदूत’ बंगला मिळेल का? म्हणून विचारणा करत होते. आईची इच्छा त्याने पूर्ण केली. आज त्यांचे वडील असते, तर त्यांना खूप आनंद झाला असता. या बंगल्याशी संबंधित अनेक आठवणी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण बाळासाहेब आणि ताईसाहेबांची आली, असेही त्या म्हणाल्या.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या आठवणी यावेळी सांगितल्या. देसाई घराण्याचे नाव टिकवण्यासाठी पराभव समोर दिसत असतानाही आई राजकारणात उतरल्या, त्यांचा पराभव झाला; पण एक शब्दही तिने काढला नाही. ज्या पाटणकरांनी माझ्या आईचा पराभव केला त्यांचा मी पराभव केला, याचे समाधान आहे. ते पाटणकर आता जरी टीका करत असले, तरी माझ्या वरिष्ठांनी मला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.
‘मेघदूत’ बंगल्याशी आपले वेगळे नाते असल्याने हा बंगला मिळावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांनी तो दिला. गृहप्रवेशावेळी आईला भरून आले, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला होता. आम्ही सर्वच भावुक झालो, असे शंभूराज देसाई म्हणाले.