Shalarth ID Pudhari
मुंबई

Shalarth ID Issue: वेतनाअभावी शिक्षकांची आर्थिक कोंडी; शालार्थ आयडीसाठी शिक्षक सेना आक्रमक

तोडगा न निघाल्यास आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडीच्या प्रश्नावरून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. येत्या आठवडाभरात याबाबत ठोस निर्णय न झाल्यास वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शालार्थ आयडीअभावी शेकडो शिक्षकांचे वेतन रखडल्याने शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत.

मुंबईतील अनेक शिक्षकांचे शालार्थ आयडी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून बोर्ड कार्यालयात प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे. आयडी मंजूर न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना नियमित वेतन मिळत नसून, अनेकांवर आर्थिक कोंडीची वेळ आली आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मागील आठवड्यात आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी बोर्डाचे अध्यक्ष नितीन बोरसे यांची भेट घेऊन प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शिक्षक सेनेने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बैठकीला शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. जगदीश भगत, मुंबई ज्युनिअर कॉलेज विभागीय अध्यक्ष विशाल बावा, मुंबई कार्याध्यक्ष कैलास गुंजाळ, सरचिटणीस मुरलीधर मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.

विभागीय मंडळावर विराट मोर्चा निघेल

प्रशासकीय दिरंगाईमुळे शिक्षकांचा संयम सुटला आहे. आठ दिवसांत यावर ठोस तोडगा न निघाल्यास आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील दहावी बारावीच्या मुंबई विभागीय मंडळावर विराट मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT