मुंबई : महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवे बळ देणाऱ्या महाराष्ट्र राज्य शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या उभारणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली असून, या महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत आहे. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा या महामार्गाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून ‘शक्तिपीठ संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे अलीकडेच उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते आणि सूत्रसंचालक भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास तयार असलेले शेतकरी तसेच समृद्धी महामार्गामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करत या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. समृद्धी महामार्गामुळे झालेल्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव मांडताना अनेक शेतकऱ्यांनी नव्या संधी, वाढलेली जमीनमूल्ये आणि रोजगारनिर्मिती यांचा उल्लेख केला, ज्यामुळे शक्तिपीठ महामार्गाविषयीही आशावाद अधिक बळकट झाला आहे.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्हाधिकारी वानमथी सी. तसेच ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, ‘एमएसआरडीसी’ मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली, संभाव्य फायदे स्पष्ट केले आणि जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय्य मोबदल्याची हमी दिली असून, शक्तिपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले लोकसहभागाचे पायाभूत काम यशस्वीपणे सुरू झाल्याचे चित्र पवनार येथे पाहायला मिळाले.