मुंबई

Bollywood Drug Racket : शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटातील अभिनेत्याला थेट शूटिंग सेटवरून बेड्या; ५.६० लाखांचे ड्रग्ज जप्त

FIR नुसार रोहुल्लाह मेहदी हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता शाहिद कपूरच्या ‘देवा’ या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ‘रोहंज भाई’ ही भूमिका साकारणारा अभिनेता आणि मॉडेल रोहुल्लाह मेहदी याला काशीमीरा पोलीस गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या एका आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत ५.६० लाख रुपये किमतीचे २८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार रोहुल्लाह मेहदी हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई व लगतच्या मीरा रोड परिसरात व्हॉट्सअ‍ॅप आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून संशयित तस्करांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, दहिसर चेकनाका येथील ठाकूर मॉलजवळ २८ ग्रॅम एमडी पोहोचवण्यासाठी कासिफ नावाच्या व्यक्तीला बोलावण्यात आले. अंमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असतानाच पोलिसांनी कासिफला रंगेहाथ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने रोहुल्लाह मेहदी याच्या नावाचा खुलासा केला. या माहितीच्या आधारे तपास पथकाने तत्काळ कारवाई करत मालाड येथील एका स्टुडिओबाहेरून मेहदीला अटक केली; त्यावेळी तो एका चित्रीकरणात व्यस्त होता.

मूळचा जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्याचा असलेला रोहुल्लाह मेहदी सध्या मुंबईतील गोरेगाव भागात वास्तव्यास आहे. त्याने ‘देवा’ चित्रपटाव्यतिरिक्त काही लोकप्रिय वेब सिरीजमध्येही काम केले आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा पोलिसांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली. या रॅकेटचे जाळे चित्रपटसृष्टीतील इतर व्यक्तींपर्यंत पसरले आहे का आणि मेहदीने आतापर्यंत कोणाकोणाला हे अंमली पदार्थ पुरवले आहेत, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT