मुंबई : दहिसर येथील एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश करुन दोन महिलांना अटक केली. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी तीन मुलींची सुटका केली असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या तिन्ही मुलींना कांदिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहेत.
स्वतच्या मुलीच्या मदतीने दोन्ही आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरातील विविध हॉटेल, लॉज आणि गेस्टहाऊसमध्ये काही महिला ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्यासोबत त्यांच्या परिचित तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती.
फोनवरुनच आर्थिक व्यवहार केल्यानंतर तिला काही तरुणींना घेऊन दहिसर येथील एका फॅमिली रेस्ट्रॉरंटमध्ये बोलावण्यात आले. ठरल्याप्रमाणे बुधवारी तिथे दोन महिला तीन तरुणींसोबत आल्या होत्या. बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस व त्यांच्या पथकाने तिथे छापा टाकून या दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून त्यातील एक तरुणी अल्पवयीन तर दोन तरुणी त्यांच्याच मुली असल्याचे उघडकीस आले.
गरीबीला कंटाळून त्यांची आई त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर या दोन्ही महिलांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्या दोघीही पोलीस कोठडीत आहे. तिन्ही तरुणींना कांदिवलीतील बोईसरच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.