ठाणे : मुंबई, ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार्या शहापूर तालुक्यातील 30 गावे आणि 119 पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर मुरबाड तालुक्यातील 5 गावे व 8 पाड्यांवरील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. डोक्यावर सूर्य देव आग ओकत असताना 35 गावे 127 पाड्यांमधील 58 हजार गरीब, आदिवासी जनतेला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी दोन ते पाच किलो मीटर भटकंती करावी लागत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या आणि कागदावर रेखाटलेल्या पाणी पुरवठा योजना या कोरड्या राहिल्याने आदिवासींना जगण्यासाठी दररोज 47 खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढताना दिसत आहे. काही पाड्यांवर दोन दिवसांनी टँकर जात असल्याने पाण्याच्या थेंबासाठी कुणावर प्राण गमावण्याचा बाका प्रसंग ओढवला तर आश्चर्य वाटू नये, अशी बिकट परिस्थिती धरणांच्या तालुक्यात निर्माण झालेली दिसून येते.
तीन कोटी मुंबई, ठाणेकरांची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या शहापूर तालुक्यात आहे. मात्र त्याच शहापूरमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, यावर कुणाचा विश्वास बसत नाही. पण जसे दिसते, तसे नसते, या उक्तीची प्रचिती शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीवरून येते.
शहापूर तालुक्यात तानसा, भातसा आणि वैतरणा ही महत्वाची धरणे आहेत. या धरणातून होणार्या पाणी पुरवठ्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तीन कोटी लोकांची दररोज तहान भागविली जाते.