मुंबई : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असताना राज्यात रक्तसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यात सध्या केवळ ३४,३०९ रक्त युनिटस् उपलब्ध आहेत. त्यापैकी मुंबईत ६४३१ युनिटस् रक्तसाठा उपलब्ध आहे. मात्र, राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये सिंगल डोनर प्लेटलेटस् (एसडीपी)चे एकही युनिट उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच सात जिल्ह्यांमध्ये रँडम डोनर प्लेटलेटस् (आरडीपी)चा साठा पूर्णपणे संपल्याची भीषण परिस्थिती आहे.
एसबीटीसीच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर, नांदेड, नंदूरबार, धाराशिव, परभणी, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये एसडीपी युनिट उपलब्ध नाहीत. डेंग्यू, कर्करोग, थॅलेसेमिया आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी एसडीपी युनिट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
* ७ जिल्ह्यांत आरडीपीचा शून्य साठा : पावसाळ्यात डेंग्यू आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने प्लेटलेटस्ची गरज अधिक भासते. मात्र, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये आरडीपीचे एकही युनिट उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. पुरेशा प्रमाणात प्लेटलेटस् उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
* पाच जिल्ह्यांत बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह रक्ताचाही तुटवडा : आकडेवारीनुसार राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये बी पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह रक्तगटाचा साठाही उपलब्ध नाही. अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांच्या वेळी रक्ताची तातडीची गरज असते. अशा परिस्थितीत विशिष्ट रक्तगटांचा साठा संपणे ही आरोग्य व्यवस्थेसाठी मोठी चिंता मानली जात आहे.
* दररोज तीन ते पाच हजार युनिट रक्ताची गरज : महाराष्ट्रात दररोज सुमारे तीन ते पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता असते. मुंबईत ही गरज एक ते दोन हजार युनिटस् इतकी आहे. अपघात, शस्त्रक्रिया, कर्करोग, थॅलेसेमिया आणि इतर गंभीर रुग्णांच्या संख्येनुसार ही गरज बदलत असते. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माहितीनुसार रक्तटंचाईच्या काळात ही गरज दररोज पाच हजार युनिटपर्यंत पोहोचू शकते.
* रक्तदान शिबिरांची गरज : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात रक्त व रक्तघटकांचा पुरेसा साठा राखण्यासाठी नियमित स्वेच्छा रक्तदान शिबिरे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळी सुट्ट्या, जनजागृतीचा अभाव आणि शिबिरांची घट यामुळे रक्त संकलनावर परिणाम होत असताना मागणी मात्र कायम असल्याचे चित्र आहे.
सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या मर्यादित आहे. शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर जनजागृती मोहीम आणि रक्तदान शिबिरांना वेग येईल. त्यामुळे रक्तसंकलनातही वाढ होईल.डॉ. महेंद्र केंद्रे, माजी सहायक संचालक, एसबीटीसी