मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपत असून निवृत्त होणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेत जावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याचे समजते. ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त उमेदवार असतील काय यावर चर्चा केंद्रित झाली आहे.
आपल्याला आता निवृत्त व्हायचे असल्याची इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले असले तरी त्यांनी राज्यसभेत पुन्हा जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही नेते मंडळी सक्रिय झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार निवडून येऊ शकतील हे अजित पवार यांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी यासंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या, असा दावा केला जात आहे.
सात खासदार निवृत्त होत असून रिक्त होणाऱ्या या सातही जागा महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिल्या जाणार आहेत. आमदारांनी निवडून द्यावयाच्या राज्यसभा सदस्यांची ही वर्गवारी आहे. या रिक्त जागांवर निवडून यायचे असेल तर किमान 36 आमदारांची मते लागतील.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला या संख्येची बेगमी करता येणे शक्य नाही. त्यांचे केवळ 10 आमदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 40 आमदार असल्याने त्या आधारावर शरद पवार यांना निवडून येणे अन् राज्यसभेवर जाणे सहज शक्य होणार आहे. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी त्यांना साकडे घातले जाणार आहे. मात्र ते या आग्रहाला होकार देतात काय हे कळायला वेळ लागेल असे समजते. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी अशी विनंती केली जाण्याची शक्यता दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
रिक्त होणाऱ्या जागांवर आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेना शिंदे गटाचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक खासदार निवडून येऊ शकेल. शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी एकत्र राहिल्यास त्यांचा एक खासदार निवडून येईल. मात्र राष्ट्रवादी तोपर्यंत कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
...तर शरद पवार व पार्थ पवार राज्यसभेवर एकत्र?
पार्थ पवार यांना त्यांची आई आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राज्यसभेतील जागा रिक्त झाल्यानंतर तेथे नेमले गेल्यास ते आणि शरद पवार एकत्र राज्यसभेत असतील काय, असा प्रश्नही केला जातो आहे.
निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य
शरद पवार, फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील (भाजप), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना उबाठा), रजनी पाटील (काँग्रेस), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (रिपाई).