मुंबई : सात बांगलादेशी नागरिकांना अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अटकेनंतर दहा दिवसांत तपास पूर्ण करुन एमआयडीसी पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. त्यामुळे एका महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
बायजीद आयुब शेख, नसरीन बेगम,रोजीना अख्तर, काकोली अख्तर ब्रिष्टी, रोमा बेगम मोहम्मद जिलानी, पाखी बेगम मुशरफ हुसैन कोहीनूर अख्तर ऊर्फ ऑलिजा अब्दुल मोनन शेख अशी या सातजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या महिन्यांतील 24 तारखेला अंधेरीतील जिजामाता रोड, गुरुद्वारा मेन गेटजवळील परिसरात बायजीद शेख या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याचे इतर काही नातेवाईक मुंबईसह पुणे शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी अंधेरीसह पुण्यात कारवाई करुन सहाजणांना अटक करण्यात आली. त्यात चार महिलांसह दोन पुरुषांचा समावेश होता.
या सर्व बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. दहा दिवसांत तपास पूर्ण करुन पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अंधेरीतील स्थानिक न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्याची नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच ही सुनावणी पूर्ण झाली.
यावेळी न्यायालयाने सातही बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना एक महिन्यांचा कारावास, पाचशे रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेनंतर या सर्वांना बांगलादेशात डिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे त्यांना लवकरच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.