Bhandup kidnapping case Pudhari Photo
मुंबई

Bhandup kidnapping case: काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण! कुटुंबाला संपवण्याचीही दिली धमकी

नगसेविका आशा कोपरकर यांच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड: मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. पतीशी असलेल्या संबंधांच्या संशयातून भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकाविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, जबरदस्तीने डांबून ठेवणे, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी असलेल्या आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका 56 वर्षीय महिला फॅशन डिझायनरने हे गंभीर आरोप केले आहेत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार महिला 2010 पासून भांडुप पश्चिम भागात आपल्या दोन मुलींसह राहते. 2020 मध्ये काँग्रेस नेते सुरेश कोपरकर (वय 75) यांच्याशी निवडणूक प्रचारादरम्यान तिची ओळख झाली होती.

त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांमुळे फोनवर बोलणे आणि भेटीगाठी सुरू होत्या. कोरोना काळातही त्यांनी एकत्र सामाजिक काम केले होते. मात्र, या संबंधांवरून सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर आणि मुलगी अक्षता यांनी 2022 मध्ये तक्रारदार महिलेला फोन करून शिवीगाळ केली होती.

5 मे 2026 रोजी दुपारी आशा कोपरकर यांच्या मुली अक्षता आणि मनस्वी, जावई कुणाल भोईर आणि चालक रहमान हे तिच्या घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या लहान मुलीला अश्लील शिवीगाळ करत धमकावले आणि जबरदस्तीने तक्रारदार महिलेला लिफ्टमधून ओढत नेत इनोव्हा कारमध्ये बसवले.

तिथून तिचे अपहरण करून तिला विलेज रोड, भांडुप येथील सुरेश कोपरकर यांच्या कार्यालयात नेण्यात आले. कार्यालयात नेल्यानंतर अक्षता, मनस्वी, कुणाल भोईर आणि सर्वेश कोपरकर यांनी महिलेचे दोन्ही मोबाईल हिसकावून घेतले आणि तिची तपासणी केली

इतकेच नव्हे तर, महिलेच्या मदतीला धावून आलेल्या रसल फर्नांडिस नावाच्या तरुणालाही कार्यालयात बोलावून कुणाल आणि सर्वेश यांनी गचांडी धरून बेदम मारहाण केली. यावेळी माजी नगरसेविका आशा कोपरकर यांनी महिलेला आणि तिच्या मुलींना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पैशांवरून आणि चारित्र्यावरून टोमणे मारत मानसिक त्रास दिला, तसेच “आम्ही आगरी कोळी आहोत, आम्ही कापून टाकू,“ अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे.

अखेर जीवाच्या भीतीने पीडित महिलेने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेविका आशा कोपरकर, कुणाल भोईर, सर्वेश कोपरकर, अक्षता कोपरकर, मनस्वी कोपरकर आणि चालक रहमान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस निरीक्षक सविता नारायण जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

कुटुंबाला संपवण्याचीही दिली धमकी

धक्कादायक बाब म्हणजे, 12 मे रोजी सुरेश कोपरकर यांच्या असिस्टंटने फोन करून महिलेला तिची इनोव्हा कार कार्यालयात जमा करण्यास भाग पाडले. 14 मे रोजी तिला पुन्हा कार्यालयात बोलावून कारचे ट्रान्सफर पेपर आणि मालमत्ता नावावर करण्यासाठी सही करण्याची जबरदस्ती करण्यात आली. सही न केल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकीही आरोपींनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT