Stock Market News | सलग तिसर्‍या सत्रात शेअर निर्देशांकांत वाढ 
मुंबई

Stock Market News | सलग तिसर्‍या सत्रात शेअर निर्देशांकांत वाढ

सेन्सेक्स 595, तर निफ्टी 180 अंकांनी वधारला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारत-अमेरिका व्यापार करार लवकर मार्गी लागण्याची शक्यता, दीर्घकाळ चाललेल्या अमेरिकन शटडाऊनचे निवळलेले संकट, कंपन्यांचे सकारात्मक तिमाही निकाल, यामुळे बुधवारी सलग तिसर्‍या सत्रात शेअर निर्देशांकात वाढ झाली. आयटी आणि वित्तीय संस्थांच्या शेअरभावात वाढ झाल्याने सेन्सेक्स 595 आणि निफ्टी निर्देशांक 180 अंकांनी वधारला.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 0.71 टक्क्यांनी वधारून 84,466 अंकांवर झेपावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.70 टक्क्यांनी वाढून 25,875 अंकांवर गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला विदेशातील कुशल कामगारांची आवश्यकता भासणार असल्याचे वक्तव्य केले. त्याचे सकारात्मक पडसाद आयटी निर्देशांकावर उमटले. निफ्टी आयटी निर्देशांकाने दोन टक्क्यांची उसळी घेतली. सोमवार आणि मंगळवारच्या सत्रात मिळून आयटी निर्देशांक 2.8 टक्क्यांनी वधारला आहे. बुधवारच्या सत्रात इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टेक महिंद्राच्या शेअरभावात तीन टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

बीएसईवर एशियन पेंट्स, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअरने सर्वाधिक वाढ नोंदविली; तर टाटा स्टील, टाटा मोटर्स पीव्ही आणि बीईएलच्या शेअरभावात घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने दोन टक्क्यांनी उसळी घेतली. टाटा स्टील, टाटा मोटर्स,भारत इलेक्ट्रॉनिक्स, कोटक महिंद्रा बँक आणि पॉवरग्रिडच्या शेअरभावात घट झाली.

सोन्यातील गुंतवणूक वाढली

चालू वर्षात (2025) सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या तुलनेत शेअर बाजारातील घसरणीचा दर अधिक राहिला आहे. या वर्षी सोन्याने 50 टक्क्यांचा परतावा दिला असून, सेन्सेक्समध्ये केवळ 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये वायदे बाजारात गोल्ड ईटीएफमध्ये 7 हजार 743 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, तर सप्टेंबरमध्ये विक्रमी 8 हजार 363 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT