Sensex Nifty Fall Pudhari
मुंबई

Sensex Nifty Fall: शेअर निर्देशांकांतील घसरण सुरूच

सेन्सेक्स 508 आणि निफ्टी निर्देशांक 165 अंकांनी खाली आला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अमेरिका-इराण युद्ध विरामाबाबतची अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा झालेली वाढ, विदेशी संस्थांचा विक्रीचा मारा यामुळे सोमवारी (दि. 1) सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्स 508 आणि निफ्टी निर्देशांक 165 अंकांनी खाली आला.

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 0.68 टक्क्यांनी घटून 74,267 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.70 टक्क्यांनी घटून 23,382 अंकांवर आला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्स 2,220 आणि निफ्टी निर्देशांक 650 अंकांनी खाली आला आहे.

सेन्सेक्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी 4.26 लाख कोटी रुपये गमावले. हिंदुस्थान युनिलिव्हर, श्रीराम फायनान्स आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्‌‍सच्या शेअर भावात घसरण झाल्याने निफ्टीचे नुकसान झाले. निफ्टी मिडकॅप, निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे 1.45 आणि 0.88 टक्क्यांनी घट झाली. निफ्टी एफएमसीजी, पीएसयू, ऑटो आणि रिआल्टी निर्देशांकात घसरण झाली. आयटी, मेटल आणि मीडिया निर्देशांकात वाढ झाली.

कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा वाढ

बेंट क्रूड ऑईलचे भाव तीन टक्क्यांनी वाढून 94 डॉलर प्रतिबॅरलवर गेले आहेत. यूएस डब्ल्यूटीआयचे भाव 3.7 टक्क्यांनी वाढून 90.5 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत.

एफआयआयची 22 हजार कोटींची शेअर विक्री

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ने दिलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) मे महिन्यात 21 हजार 940 कोटी रुपयांची शेअर विक्री केली, तर जानेवारीपासून एकूण 2 लाख 46 गजार 881 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT