Indian stock market | सेन्सेक्स 85,000, निफ्टी पुन्हा 26 हजारांपार 
मुंबई

Stock Market | सेन्सेक्स 85,000, निफ्टी पुन्हा 26 हजारांपार

विदेशी गुंतवणुकीतील वाढीमुळे शेअर निर्देशांक विक्रमाच्या दिशेने

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीत झालेली वाढ, आयटी आणि बँकिंग कंपन्यांमध्ये वाढलेली गुंतवणूक यामुळे शेअर निर्देशांकाने बुधवारी (दि. 19) विक्रमी अंकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. सेन्सेक्स 513 अंकांनी वाढून 85 हजार आणि निफ्टी निर्देशांक 142 अंकांनी वाढून 26 हजार अंकांवर गेला आहे.

मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 0.60 टक्क्याने वाढून 85 हजार 186 अंकांवर गेला आहे. सेन्सेक्स विक्रमी अंकाच्या 650 अंकांनी मागे आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 0.55 टक्क्याने वाढून 26 हजार 52 अंकांवर गेला आहे. विक्रमी अंकापासून निफ्टी 164 अंकांनी मागे आहे. इन्फोसिस 18 हजार शेअर गुरुवारी पुन्हा खरेदी करणार असल्याने कंपनीच्या शेअर भावाने 3.7 टक्क्यांनी उसळी घेतली. बीएसई-30 निर्देशांकातील एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हिंदुस्थान युनिलिव्हर आणि सन फार्माच्या शेअर भावात दीड ते चार टक्क्यांनी वाढ झाली.

निफ्टी-50 निर्देशांकातील 31 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली. मॅक्स हेल्थ इन्स्टिट्यूटचा शेअर भाव 4.30, एचसीएल टेक्नॉलॉजी 4.19 आणि इन्फोसिसच्या शेअर भावाने 3.74 टक्क्यांनी उसळी घेतल्याने निफ्टी निर्देशांकात वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 2.97 टक्क्यांनी, निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 1.16 आणि बँक निर्देशांक 0.54 टक्क्याने वधारला. निफ्टी रिअ‍ॅलिटी आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकात घट झाली. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 0.21 टक्क्याने आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.43 टक्क्याने घसरला.

रुपया वधारला; कच्च्या तेलाच्या दरात घसरण

मागणीपेक्षा तेलपुरवठा अधिक राहण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 44 सेंटस्ने घटून 64.45 डॉलर प्रतिबॅरलवर आले. तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव तीन पैशांनी वधारून 88.58 वर बंद झाला. नोव्हेंबर महिन्यात रुपया 0.29 टक्क्याने वधारला आहे.

सप्टेंबर 2024 मध्ये सेन्सेक्स-निफ्टीचा विक्रम

गेल्यावर्षी 25 सप्टेंबर 2024 रोजी प्रथमच सेन्सेक्सने 85 हजार आणि निफ्टीने 26 हजार अंकांचा टप्पा पार केला. त्यानंतर 26 सप्टेंबर 2024 रोजी सेन्सेक्सने विक्रमी 85,836 आणि निफ्टीने 26,216 अंकांवर झेप घेतली होती. त्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीत पडझड झाली. गत महिन्यात 23 ऑक्टोबरला सेन्सेक्स 85,182 आणि निफ्टी 26,085 अंकांवर गेला होता. निर्देशांकात पुन्हा घसरण झाल्यानंतर आता दोन्ही निर्देशांकांनी विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT