मुंबई : पुढारी वृत्तसेवा : निवृत्तीनंतरही काही स्थिर उत्पन्न मिळवायचे असल्यास ज्येष्ठांना ठेवींचे चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. खासगी आणि सार्वजनिक बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षे मुदतीच्या ठेवींसाठी ८.०५ टक्के व्याज मिळविण्याची संधी आहे. इतकेच काय तर करपात्र उत्पन्नावर वजावटही मिळवू शकतात.
आर्थिक गरज आणि क्षमतेनुसार ६० अथवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना बचत कालावधीची निवड करता येईल. अगदी काही महिन्यांपासून ते काही वर्षे मुदतीसाठी ठेव ठेवता येईल. ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज हवे असल्यास त्यांना किमान तीन वर्षे कालावधीची मुदतठेव फायदेशीर ठरेल. सध्या खासगी आणि सार्वजनिक बँका आकर्षक व्याजदर देत आहेत. येत्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केल्यास ठेवींवरील व्याजातही घट होईल. खासगी बँकांमध्ये डीसीबी बँक तीन वर्षांच्या ठेवीवर सर्वाधिक ८.०५ टक्के व्याज देत आहे. आरबीएल, येस बँक ८ आणि एसबीएम बँक ७.८ टक्के व्याज देऊ करत आहे. फेडरल, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक साडेसात टक्के व्याज देत आहे. इंडसइंड आणि बंधन बँकेने पावणेआठ टक्के व्याज देऊ केले आहे. सीएसबी बँकेचा व्याजदर सर्वांत कमी ६.२५ टक्के आहे. इतर बँका सव्वासहा टक्क्यांपेक्षा अधिक आणि ८ टक्क्यांहून कमी व्याज देऊ करत आहेत. सार्वजनिक बँकांमध्ये कॅनरा बँक सर्वाधिक ७.९ टक्के व्याज देत असून, खालोखाल कर्नाटक आणि येस बँक ७.७५ टक्के व्याज देत आहे. पंजाब अँड सिंध बँक सर्वांत कमी साडेसहा टक्के व्याज देऊ करत आहे, तर इतर बँकांचा व्याजदर साडेसहा ते ७.९ टक्क्यांदरम्यान आहे. इंडसइंड बँकेच्या संकेतस्थळानुसार ज्येष्ठ नागरिक पाच वर्षे मुदतीच्या ठेवींद्वारे मिळणाऱ्या व्याजावरील उत्पन्नावर वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत वजावट घेऊ शकतात.