मुंबई : आमच्याकडे ७० हजार शूटर्स आहेत. मुंबईतही आमचे अनेक साथीदार आहेत. तुम्ही दोन माराल तर आमचे २०० भाऊ तयार असतील, असा इशारा देणारी नवी ध्वनी चित्रफीत अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या बिष्णोई गँगच्या अनिल पंडितने सोमवारी जारी केली.
अभिनेता सलमान खान जोपर्यंत गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची आणि समस्त बिष्णोई समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत त्याला क्षमा नाही. त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्वांनाच आम्ही टार्गेट करू, अशी धमकीही अनिल पंडितने दिली आहे. सलमान माफी मागत नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा आम्ही नरक करून राहू, असे तो म्हणताे. ही ध्वनी चित्रफीत अनिल पंडितनेच जारी केली याची पुष्टी झालेली नाही. मात्र, या ध्वनी चित्रफितीचे धोगेदोरे पुण्याशी जुळत असल्याचे म्हटले जाते.
या ध्वनी चित्रफितीत अनिल पंडितने अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूचाही उल्लेख केला. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली तेव्हा तुम्ही सारे कुठे होता? सुशांत सिंगची हत्या बॉलीवूडच्याच लोकांनी केली. बॉलीवूडमधील लोक त्याच्या मृत्यूस जबाबदार आहेत, असा आरोप त्याने केला. बिष्णोई गँगची लढाई ही देशाच्या गद्दाराविरुद्ध असल्याचा दावा करत अनिल पंडितने बॉलीवूडवर आरोपांची राळ उडवली आहे
. 1. कथित ऑडिओमध्ये बोलणारी व्यक्ती स्वतःची ओळख अनिल पंडित अशी करून देते आणि आपण लॉरेन्स बिष्णोईचा धाकटा भाऊ असल्याचा दावा करते. या ऑडिओ क्लिपची पोलिसांकडून सत्यता पडताळणी केली जात आहे.
2. कोटा पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी, सोमवारी पत्रकार परिषदेत अनिल पंडित हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असून, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे.
3. टायगर श्रॉफवर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी पोस्ट पुण्यातून करण्यात आली होती, असे वृत्त आहे. पोलिस या पोस्टचे लोकेशन तपासत आहेत. यापूर्वी बाबा सिद्दिकी हत्येतही पुण्याचाच शूटर आढळला होता.