BJP vs Shivsena Pudhari
मुंबई

BJP vs Shivsena: सेना-भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच; परिषदेच्या 7 जागांसाठी शिंदे सेना आग्रही

चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा बावनकुळेंचा दावा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही संपलेला नसून जागेच्या संख्येवरून शिंदेसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 7 जागांवर दावा ठोकत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. विशेषतः ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी सोमवार, 25 मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. महायुतीमध्ये सुरुवातीला ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवेसना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार असल्याची चर्चा होती.

महायुती म्हणून ही निवडणूक एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमतही झाले असले, तरी शिंदे सेनेने 7 जागांवर दावा ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथे भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर आलेला नाही.

विशेषतः ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विभागांमध्ये जागावाटपाचा मोठा पेच आहे. शिवसेनेने ठाणे आणि संभाजीनगरमध्ये दावा कायम ठेवला असताना, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुण्यावर जोरदार दावा केला आहे.

या भागांत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने मित्रपक्षांना कितपत जागा सोडायच्या, असा प्रश्न भाजपसमोर आहेे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांना विशेष महत्त्व असते. अलीकडच्या काळात अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे स्थानिक बळ वाढले आहे. त्यामुळे पारंपरिक जागांची अदलाबदल केल्यास स्थानिक पातळीवर नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

एक-दोन जागांवर निर्णय बाकी

महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेवर आमचे जवळपास 99 टक्के एकमत झाले आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावर शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ज्या पक्षाकडे विद्यमान जागा आहेत, त्या जागांवर संबंधित पक्षाचा दावा कायम ठेवण्याबरोबरच इतर मतदारसंघांमध्ये स्थानिक संख्याबळ आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला 4 जागा?

सात जागांची मागणी करणाऱ्या शिंदे सेनेला भाजपने चार जागा देण्याची तयारी केल्याचे समजते. मात्र शिवसेनेला अधिक जागा दिल्यास राष्ट्रवादीकडूनही तशीच मागणी केली जाईल, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. पुणे आणि सांगली-सातारा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप वाटाघाटी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT