मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढायचे ठरवले असले तरी कोणी किती जागा लढायच्या यावरून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे; तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीतही आधीपासूनच बिघाडी झाली आहे. शिवसेनेने मनसेला जवळ केल्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्ष आणखीनच वाढला आहे. काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे.
मविआतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची फरफट होत असून आधी शिवसेनेसोबत चर्चा केली, तेथे काही हाताला लागत नाही म्हटल्यावर आता त्यांची काँग्रेसशी चर्चा होत आहे. काँग्रेसचे वंचित आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न असले तरी ही आघाडी होण्याची शक्यता धूसर असल्याने काँग्रेस बहुतांश ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. पुण्यात शरद पवार गटाने अजित पवारांशी जुळवून घेतल्याने तेथे काँग्रेस त्यांच्यासोबत नसेल, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडाफोडी विसरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार हे स्पष्ट झाले आहे. या आघाडीच्या घोषणेचा मुहूर्तदेखील रविवारी किंवा सोमवारी काढला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ताज्या हालचालींनुसार मुंबईतही या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे स्पष्ट संकेत आहेत. नव्या राजकीय समीकरणांमध्ये एकाकी पडलेली काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या प्रयत्नात असून, मुंबईशिवाय अन्य ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळते का याची चाचपणीही काँग्रेसकडून सुरू असल्याचे समजते. मात्र, बहुतांश ठिकाणी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन मुख्य राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या पातळीवर जागावाटपाच्या जोरबैठका सुरू आहेत. गुरुवारी दिवसभर भारतीय जनता पक्षाने मुंबईत महाआढावा बैठका घेत राज्यभरातून आलेल्या युतीच्या प्रस्तावांवर विचारविनिमय केला. मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या आणि भाजपने किती लढवायच्या याचाही अंदाज या बैठकांमधून घेण्यात आला. रविवारपर्यंत महायुतीचेही चित्र समोर येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईत शिंदे सेनेला 90 जागा ?
भाजपा आणि शिवसेना नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी मुंबई आणि ठाण्यात युती करण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मुंबईत जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी येत्या दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतील जागा वाटपात नरमाईची भूमिका घेत शिवसेनेला 227 पैकी 90 ते 92 जागा सोडण्याची तयारी भाजपाने दाखविली आहे. शिवसेना आणखी काही जागांसाठी आग्रही असली तरी त्यावर दोन दिवसात तोडगा काढला जाणार आहे. शिवसेनेने सुरुवातीला 227 पैकी 120 जागांवर दावा केला होता. भाजपाने मात्र 65 ते 70 जागा देण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर शिवसेनेने जागा वाटपात मागे येत 112 जागा मागितल्या होत्या. एवढ्या जागा देण्यास भाजपाने नकार दिला आहे. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली होती. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याही शिवसेना नेत्यांशी चर्चा झाल्या. अखेरीस भाजपाने 90 ते 92 जागा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे युतीचा तोडगा दृष्टिपथात आला आहे. काही जागांसाठी अजूनही शिवसेना रस्सीखेच सुरू आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईला दोन्ही पक्षांच्या कोट्यातून 8 ते 10 जागा दिल्या जाणार आहेत. मात्र, या जागांवर सक्षम उमेदवार देण्यासाठी भाजपा, शिवसेनेतील उमेदवार दिले जाऊ शकतात.
आघाडीत बेकी, दोन राष्ट्रवादीची एकी
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र असताना महापालिका निवडणुकीत मात्र आघाडीचे जहाज फुटले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आदी महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसने उबाठा शिवसेनेशी फारकत घेतली आहे. काँग्रेस येथे स्वबळावर लढण्याच्या पावित्र्यात आहे. तर, शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवारांनी आपला पक्ष फोडल्याचे शल्य विसरून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपले बस्तान टिकविण्यासाठी एकत्र येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे हे मनोमिलन देखील येत्या दोन दिवसात झालेले असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी रात्री मात्र अचानक दोन्ही राष्ट्रवादींत पुण्यात वाहू लागलेल मैत्रीचे वारे मुंबईतही पोहोचले. ठाकरे गटाकडे जागा मागण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र का येऊ नये, असा विचार पुढे आला आणि त्या दिशेने बोलणी सुरू झाली, असे समजते.
काका-पुतणे एकत्र येणे अपरिहार्य
महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये एकत्र येण्याची चर्चा असताना आता मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाने स्वबळावर लढण्याची घोषणा करून महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने आव्हान दिल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची समीकरणे बदलली आणि त्यांच्या एकत्र येण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यात काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यात जवळीक वाढल्याने अजित पवार यांना महापालिका रिंगणात राजकीय मित्र उरला नाही. शरद पवार यांनाही मित्र नाही. यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत. ंमुंबईत महायुतीने अजित पवारांना बाजूला ठेवून शिंदे शिवसेनेसोबत जागावाटप पूर्ण करत आणल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील मैत्रीचे पुणेरी वारे मुंबईतही पोहोचले. उबाठा आणि मनसे एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसने शिवसेनेपासून फारकत घेतली आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) बँक फुटवर गेली. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी दोन्ही राष्ट्रवादीतही एकत्र येत असल्याची चर्चा सूरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी, राजकारणात काहीही घडू शकते, असे बोलून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका नेत्यानेही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा प्रस्ताव अजून आलेला नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे केले. त्या म्हणाल्या, महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्या असतील. मात्र अजून कोणताही अंतिम प्रस्ताव आलेला नाही. अंतिम निर्णय जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे घेतील.
मुंबईत 227 पैकी शिवसेनेला 90 ते 92 जागा भाजपकडून दिल्या जाऊ शकतात. 135 ते 137 जागा भाजपाच्या वाट्याला येणार असल्याचे समजते.
ठाण्यात शिंदेंना झुकते माप देत
शिवसेनेला सुमारे 90 च्या आसपास जागा देण्यात येणार आहेत. भाजपला 40 ते 41 जागा मिळू शकतात. दोन्ही
पक्षाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला रविवारी 28 तारखेला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेत काँग्रेस आणि उबाठा शिवसेना आघाडीसाठी चर्चा करीत आहे. तसेच जालन्यातही काँग्रेस आणि उबाठा एकत्र येण्याची शक्यता आहे.
नाशिक आणि मीरा भाईंदर महापालिकेत मात्र काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी चर्चा सुरू असली तरी तिला अंतिम रूप आलेले नाही.