Seasonal Workers Recruitment | गतवर्षीच्या तुलनेत हंगामी नोकर भरतीत ८.२५ टक्‍के वाढ होणार 
मुंबई

Seasonal Workers Recruitment | गतवर्षीच्या तुलनेत हंगामी नोकर भरतीत ८.२५ टक्‍के वाढ होणार

ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राकडून सर्वाधिक मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भूराजकीय अनिश्चितता कायम असतानाही यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ भरण्याची तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या महत्त्वाच्या कालावधीसाठी कुशल मनुष्यबळ आधीच उपलब्ध करून ठेवण्यावर कंपन्यांचा भर आहे. त्यामुळे यावर्षी हंगामी नोकऱ्या गत वर्षाच्या तुलनेत सरासरी ८.२५ टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संघटित किरकोळ विक्रीचा विस्तार, ई-कॉमर्स आणि जलद वाणिज्य (क्विक कॉमर्स) यामुळे लवचिक मनुष्यबळाची गरज वाढत आहे. ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एफएमसीजी आणि एफएमसीडी क्षेत्रांत सणासुदीच्या काळात मोठ्या मनुष्यबळाची गरज भासत असून, हॉस्पिटॅलिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही मनुष्यबळाची मागणी वाढत आहे.

देशांतर्गत ग्राहक मागणीमुळे भरतीला पाठबळ

सणासुदीच्या काळातील मजबूत ग्राहक मागणीमुळे भरतीचा वेग कायम आहे. ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल, क्षेत्रांत मनुष्यबळाची सर्वाधिक मागणी अपेक्षित आहे.ऑनलाइन आणि ऑफलाइन किरकोळ विक्रीतील वाढ, तसेच सणासुदीच्या काळात वाढणारी ग्राहकांची खरेदी, यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत.

हाताशी पुरेसे मनुष्यबळ

देशांतर्गत ग्राहकवर्गाचा वाढता खर्च सणासुदीच्या काळातील भरतीला बळ देत आहे. ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल, एफएमसीजी क्षेत्रांत सर्वाधिक मनुष्यबळाची मागणी असून, लहान शहरांमध्ये महानगरांच्या तुलनेत मनुष्यबळाच्या मागणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

अनेक कंपन्यांच्या वार्षिक विक्रीपैकी ४० ते ६० टक्‍के विक्री सणासुदीच्या काळात होते. क्विक कॉमर्समधील कर्मचाऱ्यांची संख्या सणासुदीच्या हंगामात ४०ते ६० टक्‍के वाढू शकते, असा अंदाज आहे. कंपन्यांना या सणासुदीच्या हंगामात मागील वर्षापेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची इच्छा आहे. अनेक संस्थांनी आधीच भरती प्रक्रिया सुरू केली असून, काही कंपन्या आपल्या गरजेनुसार मनुष्यबळ वाढवत आहेत.

संघटित स्टाफिंग क्षेत्रातील मागणी ८ ते १० टक्‍के

“संघटित स्टाफिंग क्षेत्रातील मागणी ८ ते १० टक्‍के वाढण्याची अपेक्षा आहे. ही वाढ २०२५ मधील याच कालावधीपेक्षा अधिक असेल,” असे क्वेस कॉर्पोरेशनचे स्टाफिंग विभागाचे सीईओ नितीन दास यांनी सांगितले. ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स तसेच त्यांच्या लॉजिस्टिक्स भागीदारांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कंपन्यांच्या वार्षिक विक्रीपैकी ४० ते ६० टक्‍के विक्री सणासुदीच्या काळात होत असल्याने या काळात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासते, असे ते म्हणाले.

“यंदाचा सणासुदीचा भरतीचा हंगाम सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या मागणीत वर्षभरात १५-२०% वाढ होण्याची शक्यता आहे,” असे, ऑडसिसिओ इंडियाचे जनरल स्टाफिंग प्रमुख दीपेश गुप्ता यांनी सांगितले. अनेक स्टाफिंग कंपन्यांच्या मते, पश्चिम आशियातील संघर्षाचा भारतातील भरतीवर फारसा परिणाम झालेला नाही.

महानगरांबाहेरही भरती

दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये मागणी कायम असून, टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्येही मजबूत वाढ दिसत आहे. संघटित रिटेल, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स कंपन्या ‘हायरिंग फुटप्रिंट’ म्हणजेच भरतीचा विस्तार महानगरांबाहेरही करत आहेत. त्यामुळे छोट्या शहरांमध्ये आणि नव्या बाजारपेठांमध्ये रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

कुशल कर्मचाऱ्यांचीही मोठी मागणी

फ्रंटलाइन पदांबरोबरच डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, वेअरहाऊस असोसिएट्स, पॅकर्स, रिटेल सेल्स असोसिएट्स आणि ग्राहक सेवा कर्मचारी यांचीही मोठी मागणी आहे. उच्च मागणी असलेल्या भागांत मनुष्यबळाची गरज लक्षणीयरीत्या वाढली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात विशेषतः ऑपरेशनल भूमिकांसाठी मागणी वाढत आहे. क्विक कॉमर्स आणि सप्‍लाय चेन व्यवस्थापनासाठीही कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. डिजिटल कौशल्य, वेअरहाऊस मॅनेजमेंट सिस्टम्स, हँडहेल्ड डिव्हाइसेस आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट टूल्स यांचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. रँस्ताड इंडियाच्या मते यावर्षी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या भरतीत २०-२५ टक्‍के वार्षिक वाढ अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT